मुंबई : मालाडमधील रहिवासी संकुलात एका महिलेने मुलाच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात ७ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. या घटनेचे हेलावून टाकणारे चित्रण सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर आले आहे. बांगूर नगर पोलिसांनी वाहन चालक महिलेविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलच्या मागे इंटरफेस हाईट्स नावाची इमारत आहे.
या इमारतीत महुआ मजुमदार (४५) राहतात. त्यांना अन्वय आणि अव्यान अशी सात वर्षांची जुळी मुले आहेत. ही दोन्ही मुले अन्य चार-पाच मुलांसोबत रविवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास इमारतीच्या मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी या इमारतीमधील एक महिला आपले वाहन पार्किंगमधून बाहेर काढत होत्या. मात्र मुले खेळत असतानाही त्यांनी योग्य ती खबरदारी न घेता वाहन बाहेर काढले. त्या वाहनाने तिथे खेळणाऱ्या अन्वयला धडक दिली आणि वाहनाचे चाक अन्वयच्या पायावरून गेले आणि तो वेेदनेने विव्हळू लागला.
मुलाच्या पायाला गंभीर दुखापत
या अपघातात जखमी अन्वयला कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अन्वयच्या डाव्या घोट्याला आणि पोटरीला फ्रॅक्चर झाले असून त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. सध्या अन्वयवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल
अन्वयची आई महुआ मजुमदार यांच्या तक्रारीवरून बंगूर नगर पोलिसांनी सदर महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१ (सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे गाडी चालवणे) आणि कलम १२५ (ब) (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती), तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे), कलम १३४ (अ) (वैद्यकीय मदत पुरवण्यात अपयश) आणि कलम १३४ (ब) (२४ तासांच्या आत अपघाताची माहिती न देणे) याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी वाहनतळातून (पार्किंगमधून) गाडी बाहेर काढत असताना इतर मुले बाजूला उभी होती, पण अन्वय जमिनीवर बसला होता. मी गाडीचा हॉर्न वाजवला. पण मुलगा जागचा हलला नाही आणि वहानाचे चाक त्याच्या पायावरून गेले, असे सदर महिलेने सांगितले.
