|| सुशांत मोरे
विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत प्रवासादरम्यान ‘एमआरव्हीसी’चे सर्वेक्षण;पश्चिम रेल्वेवर ४५ टक्के तर मध्य रेल्वेवर ४० टक्के महिलांकडून खंत
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना काही असामाजिक घटकांकडून प्रवासात छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने (एमआरव्हीसी) एका खासगी संस्थेच्या मदतीने विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत या स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे नुकतेच सर्वेक्षण केले. यात पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू दरम्यानच्या ४५ टक्के महिलांनी, तर मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत दरम्यानच्या ४० टक्के महिलांनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले.
एमआरव्हीसीने याआधी २०१६ ला संपूर्ण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य व हार्बर मार्गावरील महिला प्रवाशांच्या केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली होती. विरार ते डहाणू आणि नेरळ ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या महिला प्रवाशांना कोणत्या सुविधा हव्यात, हे जाणून घेण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, मालडबा, अपंग डब्यातील एकूण १ हजार ०९ महिला प्रवाशांची मते घेतली गेली.
विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले. लोकलसाठी स्थानकांत होणाऱ्या गर्दीसोबतच काही असामाजिक घटकांकडून दिला जाणारा त्रासही जास्त असल्याचे मत यातील अनेक महिलांनी व्यक्त केले. जवळपास ४५ टक्के महिला विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवासात छळ व त्रास होत असल्याचे सांगतात. यातील एक चर्तुथांश महिला रेल्वे पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येतात. काही महिला या सुरक्षा हेल्पलाइनची मदत घेऊन आपली समस्या सोडवतात. त्यातच या स्थानकादरम्यानच्या महिला प्रवाशांनी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थ स्टॉल्स, फेरीवाले, मोठय़ा प्रमाणात गर्दीचा सामना करत प्रवेश करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील नेरळ ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही आहे. कर्जत स्थानक हे गर्दीचे स्थानक झाले आहे. येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी गर्दीच्या वेळी लोकल डब्यात आसनव्यवस्था उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे १० पैकी ४ महिला प्रवाशांची प्रवासादरम्यान काही असामाजिक घटकांकडून छळवणूक व अन्य त्रास सहन करावा लागत आहे. यातील ६० टक्के महिला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करतात. तर १३ टक्के महिला हेल्पलाइनचा आधार घेत आहेत.
महिलांच्या तक्रारींचे स्वरूप
- हार्बरवरील स्थानकात उद्घोषणा व्यवस्थित होत नसल्याच्या ९३ टक्के महिलांच्या तक्रारी
- २४ टक्के महिलांची पादचारी पूल, पुलांच्या पायऱ्यांवरून चालताना, रात्रीच्या वेळी महिला डब्यात चढताना छळवणूक होत असल्याच्या तक्रारी
- ७५ टक्के महिला प्रवाशांना रेल्वे हेल्पलाइनविषयी माहितीच नाही
- काही रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस नाही.
- स्थानक आणि फलाटांवरील रोषणाई कमी. प्रसाधनगृहे अस्वच्छ
- पादचारी पूल आकाराने लहान असल्याने धक्काबुकी
हेल्पलाइनचा वापर कमी
पश्चिम व मध्य रेल्वेवरील महिला प्रवाशांच्या असलेल्या हेल्पलाइनविषयी मत व्यक्त करताना त्याविषयी जनजागृती करण्यास रेल्वे प्रशासन कमी पडले असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळेच त्याचा वापरही कमी होत असल्याचे सांगितले आहे.
