मुंबई : रस्ता ओलांडणाऱ्या २७ वर्षीय तरूणीचा टँकरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात वांद्रे – कुर्ला संकुलात (बीकेसी) गुरूवारी सकाळी झाला. मेट्रोच्या कामासाठी उभ्या केलेल्या रस्ता रोधकांजवळून रस्ता ओलांडत असताना तरुणीचा अपघात झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील मुळची रहिवासी असलेली खुशबू दीपक परियानी (२७) खार (पूर्व) येथील खेरेवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. ती एका खासगी बँकेत काम करीत होती. खुशबू गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कार्यालयात जात होती. बीकेसी येथील एशियन हार्ट रुग्णालय जंक्शनजवळून ती रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या टँकरने तिला धडक दिली. टँकरची धडक बसल्यानंतर खुशबू जमिनीवर पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या सहकाऱ्यांनी तत्काळ तिला खेरवाडीतील गुरू नानक रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हा अपघात बीकेसीमधील मुख्य सिग्नलपासून काही अंतरावर झाला. पाण्याचा टँकर कुर्ल्याहून वांद्रेच्या दिशेने जात होता. अपघातानंतर टँकर चालक ललितकुमार (३४) घटनास्थळावरून फरार झाला. नंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१, तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाडवी यांनी दिली. खुशबू बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडताना इतर सहकाऱ्यांसोबत जात होती. त्या वेळी कदाचित सिग्नल हिरवा झाला असावा आणि चालकाला ती लोखंडी पत्र्यांमुळे दिसली नसावी, असे पोलिसांनी सांगितले.
धोकादायक अडथळे
घटनास्थळी सात फूट उंच लोखंडी पत्र्यांचे रस्ता रोधक (बॅरिकेडिंग) उभे करण्यात आले आहेत. त्या पत्र्यांमध्ये फक्त सुमारे चार मीटर एवढीच अरुंद जागा असून, तेथूनच पादचारी रस्ता ओलांडतात. पत्रे सात फूट उंच असल्याने येणारी वाहने दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होतो, असे बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाडवी यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्प प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी रस्ता बंद करण्यासाठी हे रस्ता रोधक उभे केले होते. मात्र, कार्यालयात जाण्यासाठी पादचारी हे रस्ता रोधक बाजूला करतात, असेही ते म्हणाले.
