नागपूर :  राजकीय घडामोडी, पर्यटन आणि उद्योग-व्यवसायासाठी देशभरातून नागपूर आणि विदर्भात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात तब्बल ११ हजार ८६९ विमाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षात नागपूर हे राजकीय घडामोडींचे केंद्र ठरले आहे. देशभरातील राजकीय नेत्यांच्या येथे वारंवार राजकीय भेटी होत असतात. एवढेच नव्हेतर विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प, उमरेड-करांडला आणि आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांची मोठी पसंती आहे. वाघ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येऊ लागले आहे. तसेच विदर्भातील खनिज संपत्तीकडे उद्योजक आकर्षित झाले आहे. उद्योजक, व्यावसायिकांची ये-जा वाढली आहे. याशिवाय मागील वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्याच्या प्रचारसाठी स्टार प्रचारक आणि इतर नेतेही मोठ्या प्रमाणात विदर्भात आले होते. त्यामुळेही विमानांची मोठी वर्दळ नागपूर विमानतळाने अनुभवली.

१ जानेवारी ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत नागपुरात ११ हजार ८६९ विमाने उतरली. यामध्ये नियमित (वेळापत्रकात समाविष्ट) विमाने १० हजार ३५६ आणि अनियमित १ हजार ५१३ विमानांचा समावेश होता. या विमानांच्या वर्दळीतून वर्षभरात नागपूर विमानतळाला ८९.९३ कोटी महसूल प्राप्त झाला, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला.

९०६ खासगी विमान, ५४७ हेलिकॉप्टर नागपूर आणि विदर्भात पर्यटन, उद्योग, व्यवसायाकरिता खासगी विमान आणि हेलिकॉप्टरने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मागील १२ महिन्यात ९०६ खासगी विमान आणि ५४७ खासगी हेलिकॉप्टर नागपुरात उतरले. ही संख्या वाढण्याचे कारण म्हणजे २०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांसाठी खासगी विमान आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. लोकसभेची निवडणूक विदर्भात पहिल्या दोन टप्प्यात झाली तर मराठवाड्यातील तीन मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमुळे नागपूर विमानतळावर गेले महिनाभर हेलिकॉप्टर, विमानांची वर्दळ वाढली होती. विधानसभेच्या प्रचारासाठी देखील राजकीय नेते आधी विमाने नागपुरात पोहोचली आणि येथून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी हेलिकॉप्टरने प्रचारसाठी गेले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11869 flights landed at nagpur international airport in 2024 rbt 74 zws