बुलढाणा:  जिगांव धरणावर मजुरीचे काम करणाऱ्या २० परप्रांतीय मजुरांना विषबाधा झाल्याने प्रकल्प परिसरासह जलसंपदा  विभागात खळबळ उडाली आहे. उपचारानंतर या मजुरांची प्रकृती स्थिर असल्याचे  आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

  हा खळबळजनक आणि तितकाच धक्कादायक घटनाक्रम मागील दोन दिवसात घडला असून आज गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. अन्नातून विषबाधा झाल्याने हा प्रकार झाल्याचा अंदाज आरोग्य आणि अन्न प्रशासन विभागाच्या वरिष्ठानी लोकसत्ता सोबत बोलतांना वर्तविला आहे. बाधित मजुरांनी नांदुरा, खामगांव व कु-हा येथे उपचार घेतल्याचे समोर आले आहे .

नांदुरा येथुन जवळच असलेल्या जिगांव धरणावर परप्रांतीय  मजुर कामावर आहेत. रात्रीचे जेवण केल्यावर  मजुरांना वांती (उलटी), पोट दुखी, संडास असा त्रास सुरु झाल्याने काहींनी जळगाव जामोद प्रार्थनिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला.  काही मजुर खामगांव, कुऱ्हा व नांदुरा येथे उपचारसाठी गेले.नांदुरा व वडनेर, पिंपळगाव काळे येथील आरोग्य कर्मचारी यांनी अधिकाऱ्यांनी  घटनास्थळाला भेट देवुन वेळीच उपचार केल्याने संभाव्य अनर्थ टळला. तसेच अन्न औषध प्रशासनाच्या बुलडाणा येथील अधिकाऱ्यांनी सुध्दा घटनास्थळी भेट देवुन झालेल्या घटनेची माहीती घेतली.

मांडवा  गावातील  जीगाव प्रकल्पाचे वसाहतीमधील  सहा मजूर हे संडास उलटीच्या त्रासांमुळे नांदुरा रुग्णालयात  भरती झाल्याबाबत माहिती  भ्रमणध्वनीव्दारे आरोग्य विभागाच्या पिंपळगाव काळे  आरोग्य केंद्र ला मिळाली. 

केंद्राच्या आरोग्य पथकाने  भेट दिली. यावेळी आणखी ९ मजुरांना वरील त्रासामुळे कुहा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे कळाले. तसेच सदर मजुर वसाहत असलेल्या मांडवा गावापासुन सुमारे १.५ कि.मी. अंतरावर जिगाव प्रकल्पावर काम करीत आहे. यातील बहुतेक मजूर बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड बाहेर राज्यातून आले आहेत. 

तेथे एकुण ३१ मजुर पैकी २ स्त्रीया व २९ पुरुष राहतात. त्यांच्या साठी कंपनीव्दारे एकाच भोजनालयामध्ये स्वयंपाक बनविण्यात येतो.  १९ मे च्या रात्री संध्याकाळी मजुरांसाठी पत्ताकोबीची भाजी, दाळ,भात असे जेवण बनविण्यात आले. सर्वांनी तेच जेवण जेवल्याचे सांगितले. यापैकी १५ ते २० मजुरांना  दुसऱ्या दिवशी सकाळी ५ नंतर पातळ संडास व पोटदुखीचा त्रास सुरु झाला. सकाळी ८ वाजता ६ रुग्ण प्रा. आ. केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी गेले. ९ रुग्ण जवळच असलेल्या कुन्हा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेले.

टूनटून कुमार, रवि कुमार पासवन, नंदकिशोर मेहता, फिरोज फिरासत खान, राजकुमार उराव, रोहित उराव, छोटम लकडा, बलजित उराव, मोहंमद जिसान, अजित वर्मा, विश्वनाथ मानकर, वासूदेव महारा, विजय ठाकूर, अजीत वरुन, प्रेमचंद गुप्ता

ते १५ रुग्ण विस तारखेला उपचार घेवून वसाहतीमध्ये परत आले.  त्यांची प्रकृती चांगली आहे नांदुरा येथील ६ रुग्णांना प्रा.आ. केंद्रामध्ये उपचारानंतर  खामगांव उप जिल्हा रुग्णालयायत  भरती करण्यात आले. मांड वा वसाहतीमधील सर्व मजूर ६ कच्च्या घरांमध्ये वास्तव्यास आहेत. सर्व घरातील सर्वेक्षण करण्यात आले असून प्रथमदर्शी अन्नविषबाधा झाली असावी असा यंत्रणाचा अंदाज आहे. मांडवा गाव व सदर वसाहत मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले असता, गावामध्ये संडास, उलटी, पोटदुखी अशा लक्षणाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.