एका वर्षात जिल्ह्यातील तब्बल २४१ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले. त्यात २०२ मुलींचा, तर ३९ मुलांचा समावेश आहे. २११ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप २६ मुली आणि दोन मुलांचा शोध लागलेला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात दररोज बेपत्ता होणे व अपहरण यासारख्या घटना समोर येतात. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातून अचानक एक हजार ६१७ नागरिक बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल आहेत. बेपत्ता झालेल्यांपैकी एक हजार ३०६ नागरिकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ६२० पुरुष, तर ९९७ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांनी ४९१ पुरुष आणि ८१५ महिलांना शोधले आहे.

हेही वाचा – भंडारा : ऐकावे ते नवलच! गावाचे नाव पन्नाशी, पन्नास घरं अन् सर्वांचे आडनाव एकच; वाचा अजब गावाची गजब कथा

रागाच्या भरात घरातून निघून जाणे, आई-वडिलांवर रुसून निघून जाणे, घरात भांडण झाले म्हणून निघून जाणे, बदनामीच्या किंवा मार खाण्याच्या भीतीने घर सोडणे, प्रेम प्रकरण, वेडसरपणा अशी अनेक कारणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत. आजघडीला ३११ नागरिकांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वर्षभरात दोनशेवर अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांत मागील काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची आकडेवारी धक्कादायक आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मुलींचा शोध घेतलेला आहे.

हेही वाचा – बादशाह हाजीर हो! नागपूरच्या न्यायालयाचे आदेश

मागील वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बहुतेक नागरिकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित नागरिक, मुलांचा शोध सुरू आहे, असे चंद्रपूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.