गडचिरोली : गडचिरोली सीमेपासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकी नक्षलवादी चळवळीचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराज(७०) याच्यासह जवळपास २७ नक्षलवादी ठार झाले.

नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागात ही चकमक झाली. यात एक सुरक्षा जावान शहीद झाला. चकमकस्थळावर शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सिमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. यात विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी चळवळीचा देशातील सर्वोच्च नेता, सरचिटणीस तथा ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य नंबाला केशव राव देखील असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर या पारिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवावाडा, बीजापूर, नारायणपूर आणि कोंडागांव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवले.

दरम्यान, २१ मे रोजी सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला. मृत नक्षलवाद्यांमध्ये ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य नंबाला केशवराव उर्फ बसवराज याचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून यात आणखी काही मोठे ‘कॅडर’ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह, मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, हत्यार जप्त करण्यात आले आहे.

कोण होता नंबाला केशवराव उर्फ बसवराज?

नंबाला केशवराव हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेट गावचा रहिवासी होता. त्याने वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक उत्तीर्ण केले होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच तो डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतेल्या नंबालाने ‘आयईडी’ चा वापर यासारख्या लष्करी रणनीतींवर प्रभुत्व मिळवले होते. आंध्र प्रदेशात जेव्हा सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना झाली तेव्हा तो प्रमुख संघटकांपैकी एक होता. त्याने जहाल नक्षलनेता मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ ​​किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल आणि मल्ल राजी रेड्डी यांच्यासोबत बस्तरच्या जंगलात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) च्या माजी सैनिकांकडून १९८७ मध्ये ‘अ‍ॅम्बुश’ रणनीती आणि जिलेटिन हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. १९९२ मध्ये त्याची पूर्वीच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) पीपल्स वॉरच्या केंद्रीय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. २००४ मध्ये विलीनीकरणानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) ची स्थापना झाली. त्यावेळेस त्याला पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रमुख तसेच पॉलिटब्युरो सदस्य बनवण्यात आले. त्याच्याकडे लष्करी रणनीती आणि स्फोटकांचा वापराचे विशेष कौशल्य होते. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये झालेल्या जवळजवळ सर्व मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता.

पोलिस सूत्रांनुसार, आंध्र प्रदेशातील अराकू येथे तेलुगू देसम पक्षाचे नेते किदारी सरवेश्वर राव आणि छत्तीसगडमधील भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या हत्येमागे बसवराज याचा हात असल्याचे सांगितले जाते. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, २०१० मध्ये दंतेवाडात ७६ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. जीराम घाटी हल्ला ज्यामध्ये माजी राज्यमंत्री महेंद्र कर्मा आणि छत्तीगड काँग्रेस नेते नंद कुमार पटेल यांच्यासह २७ जणांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीतील लाहेरी, जांभूळखेडा सारख्या मोठ्या हल्ल्याचा सूत्रधार तोच होता. त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला दशकभरातील सर्वात मोठा हादरा बसला आहे.