नागपूर : जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अन्न, वस्त्र, निवारा यानंतर स्मार्ट फोन ही मूलभूत गरज झाली आहे. मात्र, देशातील ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट झालेल्या फोनवर मुळीच विश्वास नाही. ‘हेल्पेज इंडिया’ द्वारा केलेल्या एका सर्वेक्षणात ५९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी ‘स्मार्ट फोन’ ची भीती वाटत असल्याची भावना व्यक्त केली. याच अहवालात ७१ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी साधारण ‘किपॅड फोन’ अधिक विश्वासार्ह असल्याचेही सांगितले.

‘हेल्पेज इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने देशातील दहा शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मुंबई, नागपूरसह दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कानपूर, बंगळुरू आणि मदुराई या दहा शहरांचा समावेश आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची डिजिटल समाविष्टता आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर माहिती प्रकाशित करण्यात आली.

सर्वेक्षणानुसार, ७१ टक्के ज्येष्ठ नागरिक सामान्य किपॅड फोनचा वापर करतात. अॅप आधारित स्मार्ट फोन त्यांना सुविधाजनक वाटत नाही. बहुतांश ज्येष्ठ नागरिक फोनचा वापर केवळ कॉल करण्यासाठी करतात. फोनच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल, सोशल मिडिया तसेच इंटरनेटच्या वापराबाबत त्यांना असहज वाटते. एकटे राहणारे, कमी शिक्षण असणारे, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची स्थिती याबाबत अधिक वाईट असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. ६६ टक्के ज्येष्ठ नागरिक स्मार्ट फोनला गोंधळात टाकणारी बाब मानतात तर ५१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना चुका करण्याची भीती असल्याने ते स्मार्ट फोनपासून दूर राहणे पसंत करतात.

नातवंडांकडून ‘डिजिटल’ ज्ञान

४२ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी ‘डिजिटल’ ज्ञान प्राप्त करण्याची तयारी दर्शवली आहे. यात त्यांना सर्वाधिक मदत नातवंडांकडून मिळते. आजी-आजोबांना स्मार्ट जगातील गोष्टींबाबत ५२ टक्के नातवंडे मदत करतात.

वापरकर्त्यांची संख्या

  • साधारण किपॅड फोन -७१ टक्के
  • स्मार्ट फोन – ४१ टक्के
  • संगणक – १३ टक्के
  • टॅबलेट – ११ टक्के
  • समाज माध्यम – १३ टक्के
  • ऑनलाईन सुविधा -५ टक्के