शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीत एका वर्षात तिप्पट नफा देण्याचे आमिष दाखवून पती-पत्नीने ग्राहकांची ६५ लाखांनी फसवणूक केली. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला. दीपक कुरानी व हिना कुरानी (रा. स्वावलंबीनगर) असे आरोपी दाम्पत्याचे नाव असून पती दीपकचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाले. हरीश कोलार (५३) रा. पांडे लेआऊटच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मोठी पर्यावरण हानी झालेल्या ५० विभागांत महाराष्ट्र; ; भारतातील नऊ राज्यांचा समावेश

हरीश आणि आरोपी दीपक दोघेही एलआयसी एजंट म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. एलआयसीच्या कामासोबतच दीपक वेगवेगळी कामे करायचा. त्यासाठी खामला येथे त्याने कार्यालयही उघडले होते. आरोपी दीपकने एकदा कोलार दाम्पत्याला घरी बोलाविले. यावेळी त्याने पत्नीसोबत मिळून दीपक यांना शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा मिळण्याचे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडून दीपक यांनी आरोपींकडे ४१ लाख रुपये गुंतविले. या योजनेबाबत दीपक यांनी त्यांचे मित्र रमाकांत उमप (रा. काटोल) यांनाही सांगितले. त्यांनीही आरोपींकडे १ लाख १० हजार रुपयांची गुंतवणूक केली. तसेच परेश पटेल (रा. धंतोली) यांनी ७ लाख १६ हजार रुपये, मुकेश पटेल (रा. व्यंकटेशनगर) यांनी ११ लाख तर मिलिंद वंजारी (रा. उमरेड रोड) यांनी ५ लाख रुपये आरोपींच्या योजनेत गुंतविले.

हेही वाचा- बुलढाणा: शेतकऱ्यांवरील लाठीमार षडयंत्रच ! मला संपविण्याची सुपारी देण्यात आली; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप

मात्र, वर्ष झाल्यानंतरही फिर्यादी व त्यांच्या मित्रांना गुंतवणुकीवर लाभ मिळाला नाही. तसेच मूळ रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कुरानी दाम्पत्य टाळाटाळ करू लागले. दरम्यान आरोपी दीपक कुरानी यांचे ९ डिसेंबर २०२१ रोजी निधन झाले. त्यामुळे गुंतवणूकदार ग्राहक पेचात पडले. दरम्यान आरोपीची पत्नी हिना कुरानी ही सुद्धा योजनेत सामील असल्याने दीपक यांनी तिच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. हिनाने त्यांना दोन वेळा ४१ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, दोन्ही वेळा धनादेश वटलाच नाही. शेवटी कंटाळून दीपक व इतर गुंतवणूकदारांनी प्रकरणाची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. पोलीस उपायुक्त अर्पित चांडक यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 lakh fraud with the lure of triple profit in nagpur adk 83 dpj