लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या ६६ जागांसाठी तब्बल आठ हजार ८९४ अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात मैदानी चाचणीला उद्या बुधवारी सुरूवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये सन २०२२-२०२३ या कालावधीमधील पोलीस शिपाई संवर्गातील ४५ पदांची व पोलीस शिपाई चालक संवर्गातील २१ पदांची भरती प्रक्रिया बुधवार,१९ जूनपासून सकाळी ४.३० वाजतापासून गोदणी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेत १९ ते २२ जून या कालावधीमध्ये शिपाई चालक या पदाचे ५ हजार १९७ उमेदवार व २४ ते २६ जून या कालावधीत पोलीस शिपाई या पदासाठी ३ हजार ६९७ उमेदवारांची प्रक्रिया पार पडणार आहे.

आणखी वाचा-पोलीस भरती : अकोला जिल्ह्यात १९५ पदांसाठी २१,८५३ उमेदवार मैदानात; १७ दिवस चालणार…

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा १९ जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. उमेदवारांना विविध पदाकरीता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरूंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदासाठी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होवू शकते. अश्यावेळी उमेदवाराची गैरसोय होवू नये म्हणून सर्व घटक प्रमुखांना व माहिती विभागाला सूचना देण्यात आली आहे. ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन मैदानी चाचणीसाठी हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अश्या उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी, तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसाचे अंतर असावे, मात्र या करीता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता, याबाबतचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागणार आहे.

शहरातील गोदणी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुलात सकाळी ४.३० वाजतापासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, उंची, धावणे चाचणी होणार आहे. त्यानंतर पोलिस वाहनातून उमेदवाराला पोलिस कवायत मैदानावर (हेलीपॅड) येथे गोळा फेक चाचणीकरीता येथे नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उमेदवाराची गोळाफेक चाचणी होणार आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेला येताना प्रवेश पत्र, आवेदन अर्जाची प्रत, मूळ कागदपत्रे, सहा पासपोर्ट फोटो, उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले इतर पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहन परवाना, आधार कार्ड आदी पैकी मूळ ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…”

संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक पीयूष जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार, महिला अंमलदार असा शेकडोहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. संपूर्ण पोलीस भरती पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. भरती दरम्यान उमेदवारांना नोकरी लावून देण्यासाठी वेगवेगळी आमिष देणाऱ्यांना बळी पडू नका, कोणी नोकरी लावून देण्याचे आमिष देत असल्यास थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून तक्रार करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी केले आहे.

शूज अनिवार्य मात्र…

नेहरू क्रीडा संकुल हे सिंथॅटीक असून त्या ठिकाणी होणाऱ्या मैदानी चाचणीकरीता शूज आणणे अनिवार्य असून उमेदवार यांनी स्पॉयकर शूज वापरण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. या मैदानी चाचणीमध्ये आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी चाचणीकरीता आरएफआयडीची मॅट मैदानावर टाकण्यात येणार असल्याने स्पॉयकर शूजमध्ये खराब होते. त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रियेकरीता येताना साधे स्पोर्ट शूज वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे.