साईनगरातील एका‎ ६७ वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला‎ सायबर गुन्हेगारांनी २ लाख ५० हजार‎ ३४४ रुपयांनी फसवले आहे. या‎ प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला आहे. पद्माकर पांडुरंग‎ पटवर्धन (६७) असे फसगत‎ झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.‎

हेही वाचा- नागपूर : शिवजयंतीच्या मिरवणुकीत तलवारी फिरवणाऱ्यांची चित्रफीत प्रसारित; संबंधित युवकांची पोलीस कोठडीत रवानगी

पटवर्धन यांनी गेल्‍या महिन्‍यात त्‍यांच्‍या मोबाईलवरील स्विगी अॅपवरून ऑनलाइन पद्धतीने जेवण‎ बोलावले होते. मात्र ऑर्डरप्रमाणे‎ जेवण न मिळाल्यामुळे त्यांना तक्रार‎ करायची होती. म्हणून त्यांनी स्विगी कंपनीच्या ग्राहक सेवा‎ केंद्राचा क्रमांक सर्च इंजिनवर शोधून त्यावर कॉल‎ केला. आपली तक्रार त्‍यांनी सांगितली. थोड्या वेळाने पद्माकर पटवर्धन यांच्‍या मोबाईलवर एका अज्ञात व्‍यक्‍तीने संपर्क साधला. आपण स्विगीमधून बोलत असल्‍याचे या व्‍यक्‍तीने सांगितले. त्‍याने एनीडेस्‍क हे अॅप डाऊनलोड करण्‍यास सांगितले. पटवर्धन यांनी गुगल प्‍ले स्‍टोअरवरून हे अॅप आपल्‍या मोबाईलवर डाऊनलोड केले. त्‍यानंतर या व्‍यक्‍तीने त्‍यांच्‍या मोबाईलमधील पेटीएम अॅप उघडण्‍यास सांगितले. त्‍यांनतर काही दिशानिर्देश दिले. पटवर्धन यांना काही प्रक्रिया करण्‍यास भाग पाडले.

हेही वाचा- नागपूर : बाबासाहेबांचा ४० फूट उंच पुतळा, १३० कोटींचा खर्च!, असे आहे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर

आपली समस्‍या लगेच सोडवली जाईल असे सांगून या व्‍यक्‍तीने मोबाईल बंद केला. काही वेळाने पटवर्धन यांना त्‍यांच्‍या खात्‍यातून तब्‍बल अडीच लाख रुपये वळते झाल्‍याचा संदेश आला आणि ते हादरून गेले. सायबर चेाराने २ लाख‎ ५० हजार ३४४ रुपये ऑनलाइन‎ वळते करुन त्‍यांची फसवणूक केली.‎ पटवर्धन यांनी गेल्‍या महिन्‍यात ऑनलाईन पद्धतीने पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी तक्रारीच्‍या आधारे चौकशी करून याप्रकरणी आता गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा- नागपूर: औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमात लवकरच बदल

नागरिकांना आपल्‍या जाळ्यात खेचण्‍यासाठी सायबर चोरटे नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्‍त्‍या लढवत असतात. नागरिक देखील अलगद त्‍यांच्‍या जाळ्यात अडकत आहेत. गेल्‍या काही दिवसांपासून सिमकार्ड, बँक खाते, फोन पे, पेटीएमची केवायसी अपडेट करण्‍याच्या बहाण्‍याने सायबर चोरट्यांनी नागरिकांच्‍या बँक खात्‍यावर डल्‍ला मारण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यासाठी एनीडेस्‍क, क्विक सपोर्ट यासारखे अॅप डाऊनलोड करण्‍यास सांगितले जाते. अॅप डाऊनलोड करताच एक रूपया, दहा रुपये, अशी रक्‍कम ऑनलाईन भरण्‍यास सायबर चोरटे सांगतात. नागरिक त्‍यांच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून पैसे भरून टाकतात. मात्र याचवेळी सायबर चोरट्यांकडून पैसे भरणाऱ्या व्‍यक्‍तीच्‍या बँक खात्‍याचा ताबा घेतला जातो. अशा सायबर चोरट्यांपासून सावध राहण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.