नागपूर : मागील पाच महिन्यांपासून गायब असलेल्या सुपारी व्यापाऱ्याचा अखेर शोध लागला आहे. संबंधित व्यापारी नंदुरबारमधून सापडला असून त्याने त्याचे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. व्यापाऱ्याच्या शरीरभर सिगारेटच्या चटक्यांच्या खुणा असून पाच महिने प्रचंड छळ झाल्याची तक्रार व्यापाऱ्याने केली आहे. या प्रकारामुळे पोलीसदेखील हैराण झाले असून यामागे नेमका काय प्रकार आहे याचा तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नानक सुहारानी असे संबंधित व्यापाऱ्याचे नाव आहे. नानक यांच्यावर अनेकांचे कर्ज झाले होते व त्यातून अनेकदा धमक्यादेखील येत होत्या. मे महिन्यात नानक पैसे आणण्यासाठी गुजरातला गेले होते. नानकच्या दाव्यानुसार तेथून परत येत असताना २० मे रोजी शेगावजवळून तीन तरुणांनी अपहरण केले व नंदुरबारला नेले. तेथे त्यांनी प्रचंड छळ केला व एका खोलीत कोंडून ठेवले होते. ते अनेकदा मारहाण करायचे व शरीरावर वाट्टेल तेव्हा सिगारेटचे चटके द्यायचे. दोन दिवसांअगोदर संधी साधत नानकने तेथून पळ काढला व एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने नंदुरबारच्या पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथून नानकने नागपुरातील त्याच्या पत्नीला संपर्क केला. पत्नीने लकडगंज पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस व पत्नीने तेथे जाऊन त्याला परत आणले. नानकच्या पत्नीने यामागे काही सुपारी व हवाला व्यापारी असल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात मे महिन्यात नानक गायब झाला असल्याची तक्रारदेखील दिली होती.

हेही वाचा – वन्यजीव सप्ताहातच वाघीण व हत्तीचा मृत्यु; शेतकरी बापलेक ताब्यात

नानकवर होते कर्ज

नानकवर अनेक व्यापाऱ्यांचे कर्ज झाले होते व त्यावरून अनेकदा धमक्या यायच्या. गुजरातला जाण्याच्या दोन दिवसअगोदरदेखील नानकला एका व्यापाऱ्याने धमकी दिली होती. नानकविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हेदेखील दाखल आहे.

हेही वाचा – राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली

तहसील पोलिसांनी घेतले ताब्यात

नानकला फसवणुकीच्या गुन्ह्यात तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय लकडगंज पोलीस ठाण्यातदेखील नानकविरोधात गुन्हा दाखल आहे. अपहरण झाल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे याची चौकशीदेखील पोलीस करत आहेत. त्याचा दावा किती खरा आहे याचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती लकडगंज पोलिसांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A betel nut trader who has been missing for the past five months has finally been found adk 83 ssb