अकोला : हुंड्यासाठी विवाहितेचा झळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी विवाहितेने पतीपासून घटस्फोट घेत हुंड्यासाठी पती, सासू व सासऱ्यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट फैलातील दीक्षा आशिष बाविस्कर (२२) यांच्या तक्रारीनुसार, जळगाव येथील जय गुरुदेव नगरातील रहिवासी आशिष बाविस्कर याच्यासोबत फिर्यादीचे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर पती आशिषने विवाहितेचा मानसिक छळ करणे सुरू केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तू मला पसंत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये आंदण कमी दिले, असे म्हणत नेहमी मारहाण करीत होता. सासू अंजना बाविस्कर व सासरे सुभाष बाविस्कर हे पतीला प्रोत्साहन देत होते. ‘हिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुला आम्ही करून आणतो’, असे म्हणत छळ करत होते. गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. संसार करायचा असल्याने विवाहितेने माहेरी याची वाच्यता केली नाही. अखेर पती व सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आई-वडिलांना सांगितले. या प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A married woman was harassed for dowry finally divorced ppd 88 ysh