वर्धा : देवळीच्या औद्योगिक  वसाहतीत असलेल्या एसएमडब्लू  पोलाद कारखान्यात काम करणाऱ्या दोन हंगामी कामगारांचा मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता कंपनीचा हलगर्जीपणा निष्पन्न झाला.त्याची दखल घेत पोलीसांनी कारखाना प्रशासन व मनुष्यबळ देणाऱ्या कंत्राटदारास दोषी ठरवून गुन्हे दाखल केले आहे. कंपनीचे संचालक मनू जॉर्ज, प्रतीक बिंदल, आशिष भट, ब्रिजेश यादव, श्याम मुंदडा, रमेश नाथ, प्रसाद कुकेकर तसेच कंत्राटदार हर्षल राजू गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल झाला आहे. यात प्रकल्प प्रमुख, मनुष्यबळ अधिकारी यांचाही समावेश आहे.

यापैकी गायकवाड यश अटक झाली आहे. या प्रकरणात मृताकांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतले होते.१७ वर्षीय रितिक प्रकाश कामडी याला नियमबाह्यपणे  कामावर घेतल्याचा तसेच भर उन्हात त्याच्याकडून काम करवून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मृत अमित प्रमोद मातकर याच्याबाबत प्रशासनाचा निष्काळजीपणा तसेच वैद्यकीय सेवा देण्यात वेळ वाया घालविण्यात आल्याचा आरोप आहे.या दोन्ही मृत्युंसाठी कारखाना प्रशासनास दोषी ठरविण्यात आले आहे. सदोष मनुष्यवध तसेच बालकामगार अधिनियम व कारखाना अधिनियम अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. प्रारंभी हे उष्माघातचे बळी म्हणून सांगत उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची भूमिका घेण्यात आली होती. ही घटना २८ मे रोजी मंगळवारी सायंकाळी घडली.

हेही वाचा >>>ताडोबात पुन्हा एकदा वाघाची कोंडी, पर्यटक वाहनांनी मोडले नियम

 कामडी व मातकर  हे गत काही दिवसापासून या कारखान्यात कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. रोशन कामडी हा सायंकाळी कारखाना परिसरात असतांना त्याला अचानक भोवळ आली होती. त्यात तो खाली पडला. तेव्हा तिथे उपस्थित इतर कामगारांनी त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे मातकर हा पण भोवळ आल्याने खाली पडल्यानंतर त्यास वारंवार झटके येवू लागले होते. त्यास सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री तो पण दगावला. बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

आता ही बाब गंभीर असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर चौकशीची सूत्रे वेगात फिरली. कारखाना प्रशासन व  कंत्राटदार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करीत अटक करण्याची हालचाल सूरू झाली आहे. दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने देवळीत संताप व्यक्त होत असून अश्या प्रकारची ही पहिलीच कारवाई कारखान्यवर झाल्याचे सांगितल्या जात आहे.