यवतमाळ : काका-पुतणे रात्री बंदूक घेऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेले. शिकार करताना काकाचा नेम चुकला आणि बंदुकीच्या गोळीने थेट पुतण्याचा निशाणा साधला. पुसद तालुक्यातील फेट्रालगतच्या जंगलात घडलेल्या या थरारक घटनेची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा आहे. या प्रकरणी अखेर खंडाळा पोलिसांनी काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेट्रा गावातील बाळू पांडुरंग कुरडे व श्याम कुरडे हे काका-पुतणे बुधवारी रात्री जंगल परिसरात शिकारीसाठी छर्ऱ्याची १२ बोरची मोठी बंदूक घेऊन गेले होते. अंधारात शिकार टप्प्यात येताच काकाने बंदुकीतून फायर केले. मात्र येथेच घात झाला. काकाचा नेम चुकल्याने बंदुकीची गोळी पुतण्या श्याम याला लागली. बंदुकीतून सुटलेले छर्रे त्याच्या पाठीत व पोटात गेल्याने तो गंभीर जखमी होऊन कोसळला.

हेही वाचा – भाजपाचीही ‘मध्यान्ह भोजन’ योजना! पण एका दिवसापूरतीच…

या प्रकाराने घाबरलेल्या काकाने अज्ञात मारेकऱ्यांनी दोघांवर हल्ला केल्याचा बनाव केला. याबाबत खंडाळा पोलिसांत फिर्यादही दिली. पोलिसांनी जखमीला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जखमी श्याम कुरडेचा भाऊ करण कुरडे याने याप्रकरणी खंडाळा पोलिसांत काकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून खंडाळा पोलिसांनी आरोपी बाळू कुरडे याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person who went for hunting injured in gun firing nrp 78 ssb