अकोला : दुचाकीवरून संशयास्पद फिरणाऱ्या चार तरुणांनी गस्तीवरील पोलीस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर रस्त्यावर रविवारी पहाटे घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलीस थोडक्यात बचावले. घटनेनंतर पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

उरळ पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यामध्ये हातरूण आणि मांजरी भागात बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मूंडे हे चारचाकी पोलीस वाहनातून पेट्रोलिंग करत होते. यावेळी कंचनकडून दोन दुचाकी येत होत्या. पोलिसांचे वाहन पाहताच दुचाकी वाहने वळवून पळू लागले. पोलिसांना हे दिसताच त्यांनी पाठलाग केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून दुचाकीवरील तरुणांनी पोलीस वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला. गोळीबारात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले. त्यानंतरही पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. रस्ता खराब असल्यामुळे पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागला.

हेही वाचा – घरफोडी-लुटमारीच्या गुन्ह्यात सर्वाधिक बालगुन्हेगार; महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? जाणून घ्या…

हेही वाचा – वर्धा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न, पण तिची किंकाळी अन् आरोपींनी ठोकली धूम

कंचनपूनपर्यंत पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, नंतर दुचाकीस्वार दिशेनासे झाले. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देताच दहीहंडा आणि इतर पोलिसांनी ठिकठिकाणी रस्त्यावर नाकाबंदी केली. मात्र, हल्लेखोरांचा सुगावा लागू शकला नाही. या घटनेसंदर्भात पोलिसांना नोंद करण्यात आली असून हवेत गोळीबार करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.