भंडारा : प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतोच. जंगलात ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे अटळ सूत्र पाहायला मिळत असले, तरी कधी कधी शिकाऱ्याचीच शिकार होण्याचे प्रसंग उद्भवत असतात. जंगलात शिकार करताना अनेकदा प्राण्यांची फसगत होते. पण, त्यानंतर जे घडतं ते अनेकदा पाहणं आश्चर्यकारक असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघांचाही मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील चिखला या गावात एका वाघिणीने शिकारीसाठी रानडुक्कराचा पाठलाग केला पण यावेळी अंदाज चुकल्याने वाघीण आणि रानडुक्कर थेट विहिरीत पडले. विहिरीतून बाहेर न पडता आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस येताच ग्रामस्थानी घटनास्थळी एकच गर्दी केली.

अशी उघडकीस आली घटना…

तुमसर वन परिक्षेत्राच्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिखला गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर एक मोठी विहीर आहे. आज सकाळी काही ग्रामस्थ विहिरीच्या बाजूने जात असताना दुर्गंधीमुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार शरद शेवाळे तात्काळ घटनेस्थळी पोहचले. ठाणेदार शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वाघीण रानडुकराचा पाठलाग करत असताना ते दोघेही विहिरीत पडले असावे. विहिरीत पडल्यानंतर वाघीण आणि डुक्कर दोघेही शिकारीची घटना विसरले.

विहिरीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी दोघेही धडपडू लागले. त्यातच वाघाचे समोरील नखेही तुटली असावीत. अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी. विहिरीतून बाहेर न पडता आल्याने दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे ठाणेदार शेवाळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या वाघीण आणि डुकराला माशा भिनभिणत होत्या. शिवाय दुर्गंधीही पसरली होती. वाघीण आणि डुकराला विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tigress and a wild boar died after falling into a well while hunting in chikhla village of bhandara district ksn 82 phm 00