नागपूर : वन्यप्राण्यांना सुरक्षितरित्या मार्ग ओलांडता यावा म्हणून नागपूर ते जबलपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर उपशमन योजनेंतर्गत भुयारी मार्ग तयार करण्यात आले. वन्यप्राण्यांकडून या भुयारी मार्गांचा वापर होऊ लागला आहे. अलीकडेच एक वाघीण तिच्या बछड्यांसह भुयारी मार्गाचा वापर करत असल्याचे समोर आले.

महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तो देशातील ११ राज्यांमधून जातो. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नागपूर ते मध्यप्रदेशातील सिवनी महामार्गावर मनसरपासून या महामार्गाच्या दोन्ही कडेला घनदाट जंगल असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वन्यप्राण्यांचे मृत्यू व्हायचे. ते थांबवण्यासाठी डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने उपशमन योजना सुचवल्या. त्यानुसार यावर सहाशे ते सातशे कोटी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये भुयारी मार्गाचा देखील समावेश होता. वन्यप्राणी त्याचा वापर करतात की नाही यासाठी भुयारी मार्गांवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची छायाचित्रे टिपण्यात आली. एक वाघीण तिच्या बछड्यांसह या भुयारी मार्गाचा वापर करताना दिसून आली. भारतीय वन्यजीव संस्थेने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे वन्यप्राणी या उपशमन योजनांचा वापर करत असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१९ तसेच २०२० मध्येही तृणभक्षी तसेच मांसभक्षी प्राण्यांनी हा रस्ता ओलांडल्याचे दिसून आले होते. त्यावेळीही रस्ता ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांमध्ये वाघाचा समावेश होता.

हेही वाचा – वाशिम जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; हवामान विभागाच्या मते आज…

हेही वाचा – यवतमाळात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीची दहशत; १५ दिवसांपासून…

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर त्याची यशस्वीता तपासण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने कॅमेरा ट्रॅप लावले. त्यात आलेल्या छायाचित्रानुसार २०१९ साली सुमारे पाच हजार ६७५ वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला. २०२० साली सुमारे १६ हजार ६०८ वन्यप्राण्यांनी या भुयारी मार्गाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले.