प्रचार यात्रेत कार्यकर्त्यांनी घरोघरी पत्रके वाटायची आणि उमेदवाराने लोकांच्या गराडय़ातून दूरूनच मतदारांना आवाहन करायचे, असे चित्र सर्वसाधारण प्रचाराचे असते. मात्र, आम आदमी पक्षाची प्रचार यात्रा याला अपवाद ठरली. पक्षाचे उमेदवार अमोल हाडके हे स्वत: पत्रके घेऊन भाजी विक्रेत्यासोबत , दुकानदारांसोबत संवाद साधत होते.

आम आदमी पार्टीची प्रचार यात्रा गुरुवारी खामला, पांडे लेआऊट परिसरात फिरली. पांडे लेआऊट, खामला परिसरात अमोल हाडके फिरत असताना  ‘हा उमेदवार आहे?’ असे प्रश्नार्थक  भाव भाजीविक्रेते, फळविक्रेते, दुकानदारांच्या चेहऱ्यावर होते. सकाळी सकाळी चहा-पोह्यंच्या टपरीवर आपल्या आठ-दहा सहकाऱ्यांसह उभे असणाऱ्या या उमेदवाराकडे काही क्षण पाहून पुन्हा आपापल्या कामाला ते लागत होते. इंग्रजी शाळांची भरमसाठ शुल्कवाढ, सरकारी शाळांचे बंद होणे, मोफत आरोग्य सेवा या मुद्यांवर ते संवाद साधत होते. हे प्रश्न सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असले तरीही म्हणावा तसा प्रतिसाद या बाजारपेठेत दिसून आला नाही. अमोल हाडके यांच्या पत्नी डॉ. प्रियंका हाडके यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा ‘प्लास्टिक’ कचरा

काही पक्षातील कार्यकर्त्यांचा उद्दामपणा देखील  वाढला आहे. सहकारनगरातून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ नगरसेवक लहू बेहते यांनी रॅली काढली. एका कार्यकर्त्यांच्या घरासमोर मोठा लवाजमा असलेली रॅली थांबली. रॅलीतील सर्वाना बाटलीबंद पाणी आणि पाकिटबंद लस्सी देण्यात आली. तिचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचठिकाणी रिकाम्या बाटल्या आणि पाकिटे टाकली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्रावरील प्लास्टिकचा कचरा गोळा करत असताना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते मात्र कचरा करण्यात व्यस्त होते.