वर्धा : विख्यात अभिनेता आमिर खान यांचा आजचा वर्धा दौरा अत्यंत गोपनीय स्वरूपात आटोपला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी दौऱ्याची सूचना दिली होती. मात्र, याबाबत कुणालाही कळवू नका, माध्यमांना दूर ठेवा, असे त्यांनी बजावले होते. तरीही त्यांची भेट गाजलीच. आमिर खान हे पाणी फाउंडेशनचे काम बघतात. सर्वत्र चालणाऱ्या या कामासाठी आता ‘फार्मर कप’ देण्यात येणार असून त्याचा आरंभ त्यांनी वर्धा जिल्ह्यातून केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आमिर खान यांचे ‘फार्मर कप’ स्पर्धा आयोजनात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या उपक्रमातून वर्धा जिल्हा एक मॉडेल म्हणून पुढे येईल, असा विश्वास आमिर खानने व्यक्त केला.

प्रारंभी आमिर खान यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे कर्डीले यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यावेळी सहपरिवार उपस्थित होते. यानंतर परत जाताना आमिर खान यांनी सेवाग्राम आश्रमास भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या या जगप्रसिद्ध आश्रमास भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. महात्माजींचे विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या ठिकाणी आल्यावर एक नवाच आनंद व मनःशांती मिळाली. महात्माजी यांच्या विचारांचा माझ्यावर विशेष प्रभाव राहिला आहे. आमिर खान यांनी आश्रमतील बापू कुटी, निवास व अन्य ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली. या वास्तू पाहून मन धन्य झाले. ज्या परिसरात महात्माजी अनेक वर्ष राहिले, त्या ठिकाणी भेट देऊन इतिहास समजून घेतला, याचा आनंद आहे. आज येथे भेट देऊन जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही, असे आमिर खान यांनी सांगितले.

हेही वाचा : सावधान ! हिंगोलीहून वाशीमकडे जाताना ‘ही’ पाटी वाचा अन्यथा…

आमिर खान यांचे यावेळी आश्रम परिवारातर्फे सूतमाला, चरखा भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कर्डीले, पोलीस अधीक्षक हसन, पाणी फाउंडेशनचे डॉ. सचिन पावडे तसेच आश्रमचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या आकस्मिक भेटीचा कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून आयोजक संस्थांनी विशेष खबरदारी घेतली होती. पण तरीही शेतकरी संवाद व सेवाग्राम आश्रम भेट यामुळे आमिर खान या नावाची लोकप्रियता लोकांना दिसून आलीच.