लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीसह इतरही काही संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेळोवेळी आंदोलनही केले गेले. दरम्यान समितीने आता स्वतंत्र विदर्भासह राज्यातील वाढते वीजदराला विरोध, विदर्भातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयाला विरोधसह इतरही मागण्यांसाठी १० ऑगस्टला नागपुरात आंदोलनाची घोषणा केली होती.

स्वतंत्र विदर्भ राज्यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपुरात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी अडवले. येथे पोलीस व आंदोलकांत बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दोन आंदोलकांनी विधान भवनात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावण्यासाठी शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.

आणखी वाचा-श्रावणधारात वारकरी, हजारो भाविक चिंब! ‘श्रीं’ची पालखी खामगावात…

क्रांतीदिनानिमित्त घोषीत आंदोलनानुसार आंदोलकांनी नागपुरातील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावण्यासह यशवंत स्टेडीयमवरून विधानभवनावर शनिवारी लाँग मार्चची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी यशवंत स्टेडियमवर शेकडो आंदोलक एकत्र आले. आंदोलकांनी विधानभवनाच्या दिशेने लाँग मार्चसाठी कूच केली. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी टेकडी रोडवर अडवले. परंतु आंदोलक येथे थांबायला तयार नव्हते. त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत त्यांची रेटा- रेटी झाली. त्याच दरम्यान दोन आंदोलक वेगळ्या मार्गाने थेट विधानभवन परिसरात पोहचले. त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला. अचानक या आंदोलकांनी विधानभवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांची तारांबळ उडाली.

दोघांनाही पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून झेंडा जप्त केला गेला. तर टेकडी रोडवर आंदोलकांना पुढे जाऊ दिले जात नसल्याने तेही येथे उग्र होत होते. त्यामुळे प्रथम पोलिसांनी विदर्भवादी काही नेत्यांना ताब्यात घेतले. परंतु त्यानंतर नेत्यांना पोलिस ताब्यात घेत असल्याचे बघत आंदोलक संतापले. त्यांनी संताप व्यक्त करणे सुरू करताच पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेणे सुरू केले. त्यामुळे येथे पोलीस व आंदोलकांमध्ये रेटा- रेटी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तर आंदोलांकडून येथे विदर्भ राज्य आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजेसह इतरही नारे लावण्यात आले. महाराष्ट्र सरकारचा यावेळी धिक्कार केला गेला.

आणखी वाचा- श्रावणधारात वारकरी, हजारो भाविक चिंब! ‘श्रीं’ची पालखी खामगावात…

यशवंत स्टेडीयम ते विधानभवन कडेकोट बंदोबस्त

विदर्भवादी कोणत्याही स्थितीत यशवंत स्टेडीयमहून विधानभवनात पोहचू नये म्हणून पोलिसांकडून लाँग मार्च सुरू झाल्यावर आंदोलकांपासून तर विधानभवन परिसरात कडेकोड बंदोबस्त लावला होता. परंतु, त्यानंतरही विधानभवन परिसरात दोघे आंदोलक पोहचण्यात यशस्वी झाले. या दोन्ही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation in nagpur by vidarbha state agitation committee for independent vidarbha state and other demands mnb 82 mrj