अकोला : बालविवाहाचे संकट कायम असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बालविवाह नियोजित होते. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ते रोखण्यास यश आले आहे. बालविवाह ही सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी सतर्क राहत मोहिमेला वेग दिला आहे. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर दिला.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होते. हे लक्षात घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने सर्व धर्मगुरुंची परिषद घेऊन संवाद व आवाहनही करण्यात आले होते.जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर व अकोला तालुक्यात प्रत्येकी एक असे पाच बालविवाह एकाच आठवड्यात रोखण्यात आले. अकोट तालुक्यात एका १६ वर्षीय बालिकेचा विवाह २९ वर्षीय व्यक्तीसह होत असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ जाऊन हा बालविवाह रोखला. कारवाईदरम्यान कुटुंबीयांचे, पाहुण्यांचे समुपदेशन करताना त्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची माहिती देण्यात येते.

लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय मुलाचा किंवा मुलीचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाते. बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात येते, असे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनात बालकल्याण समितीच्या अनिता गुरव, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शीला तोष्णीवाल, विनय दांदळे, सुनील लाडुलकर, सुनील सरकटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे, सपना गजभिये, विशाल गजभिये, पूजा पवार, राजश्री कीर्तीवर, पूजा मनवर यांच्यासह बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्राम बाल संरक्षण समिती, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प, आय. एस. डब्ल्यू एस., एन्करेज एज्युकेशन फाउंडेशन आदी बालविवाह रोखण्यासाठी कार्यरत आहेत. देशातील बालविवाहाचे प्रमाण २०३० पर्यंत पाच टक्क्यांहून कमी करण्यासाठी देशभर बालविवाह प्रतिबंधक मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.