अकोला : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले. भर पावसात चिखलातून वाट काढत ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. झालेल्या नुकसानीची व्यथा सांगताना बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. नैसर्गिक आपत्तीने सर्वच हिरावून घेतले, आता जगावे कसे? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना केला. त्यावर कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतजमीन खरडून गेली आहे. घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी शेतात जाऊन केली. आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड,वाकद ,शेलूखडसे, पिंपरखेड,मसलापेन या गावांना, मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावाला भेट दिली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश भरणे यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परतेने कार्य करा
प्रत्येक गावात झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे पोहोचवला जाईल व तातडीने मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिका-यांनी तत्परतेने काम करावे. असे निर्देश दिले.