अकोला : जिल्ह्यात बी-बियाणे व खतांच्या कंपन्या कृषी केंद्रांना विक्री करत असताना लिंकिंग करून खते व बी-बियाण्याची विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी कारवाईची मागणी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रकारे लिंकिंग होत असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी खरीप आढावा बैठकीत नियोजनाचा आढावा घेतला होता. झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी आवश्यक निविष्ठा व इतर बाबींबाबत मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यानुसार निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अजीत १५५ ची किमान तीन लाख पाकिटे व अजित-५ ची ५० हजार पाकिटे असा बियाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली. कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यासाठी २५ हजार मे टन डीएपी खताचे आवंटन  मंजूर करून कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्याकडून पुरवठा व्हावा, त्याचप्रमाणे पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत मृग बहार २०२४ मधील अकोट तालुक्यातील उमरा मंडळात स्वयंचलित हवामान केंद्राच्या पर्जन्यमापकाशी २ ते ५ जुलै २०२४ या चार दिवसाच्या कालावधीत छेडछाड झाली असल्याने दुसऱ्या नजीकच्या हवामान केंद्राचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतही पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा, असे निर्देश कृषी यंत्रणेला देण्यात आले आहेत.

चार लाख ३२ हजार हेक्टरवर खरीप नियोजन

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ३२ हजार १० हेक्टर आहे. प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद आहेत. सरासरी पर्जन्यमान ६९४ मी.मी. होते. खरीप हंगामात सोयाबीन पीक दोन लक्ष ४१ हजार ६४५, कापूस एक लक्ष २७ हजार ३००, तूर ६५ हजार, मूग तीन हजार ४८०, उडीद तीन हजार, ख. ज्वारी दोन हजार व इतर पिकांचा समावेश आहे. युरिया २३ हजार ५०० मे.टन, डीएपीची १५ हजार मे.टन मागणी राहील.