नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय आमदारांनी आज ऐतिहासिक छायाचित्र काढलं. सर्वच पक्षांचे आमदार एकत्रित छायाचित्र काढण्यासाठी सकाळी विधानभवन परिसरात उपस्थित होते. सर्वपक्षीय आमदार एकत्र आले असले तरी या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे या फोटोपेक्षा त्यांच्या दांडीचीच चर्चा अधिक रूंगू लागली होती.

शुक्रवारी विधानसभेच्या परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी एकत्रित छायाचित्र काढलं. परंतु यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही आमदार अनुपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असल्याची माहिती दिली. आज सर्वपक्षीय नेते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यामुळे कोणताही गैरसमज होता कामा नये. विधानसभेतच या अशा प्रकारच्या फोटो सेशनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे चुकीचा अर्थ लावण्यात येऊ नये अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

माझ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्ष हे एकच आहेत. जेव्हा नवी लोकसभा अस्थित्वात येते त्यावेळी सर्व खासदारांचं मिळून एक फोटो सेशन केलं जातं. महाराष्ट्रात दोन-तीन अधिवेशनांनंतर ते केलं जातं. त्यामुळे आता नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला, असल्याचं पटोले म्हणाले. तर दुसरीकडे काही वैयक्तीक कारणांमुळे फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती राम कदम यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. अशा प्रकारचं फोटो सेशन ही एक औपचारिकता असते. हा त्याचा एक भाग आहे. सर्वांचं वैयक्तीकरित्या जिव्हाळ्याचं नातं असतंच. त्यामुळे व्यक्तीगत मतभेद असण्याचं काही कारणंच नाही, असंही ते म्हणाले.