अमरावती : मेळघाटात अजूनही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. पोट फुगताच मुलाच्‍या पोटावर चटके दिले जातात. त्‍याला डम्‍मा देणे म्‍हणतात. हा प्रकार अमानवी असूनही ही चुकीची प्रथा अजूनही सुरूच आहे. अनेक चिमुकल्‍यांना या डम्‍मा प्रकारातून यापूर्वी जीव गमावावा लागला आहे. मेळघाटातील सिमोरी या गावात २२ दिवसांच्‍या बालकाच्‍या पोटावर त्‍याच्‍या आईनेच अंधश्रद्धेतून चटके दिल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या बाळाचे वडील राजू लालमन धिकार (३०, रा. सिमोरी, ता. चिखलदरा) यांची भेट घेऊन त्‍यांचा जबाब नोंदवून घेतला, त्‍यातून ही धक्‍कादायक बाब समोर आली आहे. गेल्‍या ३ फेब्रुवारीला बाळाचा जन्‍म झाला आणि तर त्‍यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारीला राजू यांचे वडील लालमन धिकार यांचा आजारामुळे मृत्‍यू झाला. २३ फेब्रुवारीला वडिलांच्‍या दशक्रियेच्‍या कार्यक्रमानंतर सायंकाळी राजू यांच्‍या पत्‍नीने मुलगा सतत रडत असल्‍याने दोर पेटवून पोटावर अनेक चटके दिले. ही बाब त्‍यांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी मुलाला रुग्‍णवाहिकेतून अचलपूर येथील रुग्‍णालयात दाखल केले, त्‍यानंतर वैद्यकीय सल्‍ल्‍याने बाळाला अमरावतीच्‍या जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. या घटनेत आईनेच चिमुकल्‍या मुलाच्‍या पोटाला चटके दिल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने वडिलांच्‍या तक्रारीच्‍या आधारे गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात आली आहे.

बाळाला जन्‍मजात हृदयरोग

दरम्‍यान, सिमोरी येथील या २२ दिवसांच्‍या बाळाला जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. याबाबत बालकाला नागपूर येथील नेल्सन रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. बालकावर पुढील उपचार करण्यासाठी पालकांच्या सहमतीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाच्‍या कुटुंबीयांची भेट घेतली.

जिल्हा स्त्री रुग्णालयात स्पेशल न्यू वॉर्न केजर यूनीट (विशेष नवजात शिशु देखभाल) मध्ये बाळावर उपचार सुरू आहेत. बाळाची तपासणी केली असता त्याला जन्मजात हृदयरोग असल्याने बाळाची श‍स्‍त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदान झाले. त्यानुसार बाळाला नागपूर येथील नेल्सन रुग्णालयात संदर्भीत करण्याबाबत पालकांनी तयारी दर्शवली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन पालकांची समजूत काढली. जन्मजात हृदयरोग असल्याने बालकाच्या जीवितास धोका होऊ शकतो, हे पटवून दिले. त्यामुळे शस्‍त्रक्रिया करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati melghat mother torture her child due to andhashraddha inhuman practice mma 73 css