अमरावती : चांदूर रेल्वे येथील एका सर्पदंश झालेल्या १७ वर्षीय मुलाला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या मुलाची अत्यवस्थ स्थिती पाहून उपस्थित डॉक्टरांनी तत्परता दाखवत तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर या मुलावर येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) पुढील उपचार करण्यात आले. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या मुलाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याने डॉक्टर हेच खरे देवदूत असल्याची प्रचिती आली, अशी प्रतिक्रिया या मुलाच्या नातेवाईकांनी दिली.

चांदूर रेल्वे येथील एका सलूनमध्ये काम करत असताना एका १७ वर्षीय मुलाच्या उजव्या पायात सापाने दंश केला. ही घटना घडताच तातडीने त्याला अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. पण, वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.

सापाच्या विषामुळे रुग्णाच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला होता, त्यामुळे त्याला अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला ‘डायलिसिस’ करण्याची गरज असल्याचे सांगितले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. आवश्यकतेनुसार ‘डायलिसिस’ देऊन त्याची प्रकृती स्थिर केली. उपचारानंतर रुग्णाची तब्येत हळूहळू सुधारली आणि आता त्याला पूर्णतः बरे वाटत असल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफ्रोलॉजिस्ट डॉ. कोकाटे, डॉ. विक्रांत कुडमेथे, डॉ. नाहिद, डॉ. प्रियंका, डॉ. श्रद्धा जाधव आणि अतिदक्षता विभागामधील परिचारिका यांनी रुग्णावर उपचार केले.

सर्पदंशामुळे काय होते?

सर्पदंशाने जगातील सर्वात जास्त मृत्यू भारतात होतात. उन्हाळा आणि पावसाळ्यात साप चावण्याचे प्रमाण जास्त असते. साप चावणे ही कधी कधी प्राणघातक आपत्कालीन परिस्थितीत असते. दरवर्षी भारतात हजारो लोकांचे सर्पदंशामुळे मृत्यू होतात. त्यापैकी बरेच मृत्यू हे जागरूकता आणि वेळेवर वैद्यकीय उपचार याद्वारे टाळता येऊ शकतात. सर्पदंशामुळे झालेल्या अनेक मृत्यूंची नोंदच होत नाही कारण बरेचसे रुग्ण अवैद्यकीय उपचार घेतात किंवा त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत.

कृत्रिम श्वसनाची व्यवस्था असलेली आरोग्य केंद्रे, रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याची यंत्रणा आणि योग्य उपचार या तीन गोष्टी शक्य झाल्या, तर सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.