अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मधील सर्व तज्ज्ञ डॉक्टर त्यांचे एक वर्षापासून मानधन न मिळाल्यामुळे व मानधन वाढीच्या मागणीवरून संपावर गेले आहेत. यामुळे ११ मूत्रपिंड प्रत्यारोपण सारख्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि ३०० हून अधिक रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत.
एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शिक्षण आरोग्य सर्वांसाठी घरे या विषयाला प्राथमिकता द्या असे प्रशासनाला कडक निर्देश देतात. आणि दुसरीकडे सुपर स्पेशालिटी सारखे अत्यंत महत्त्वाचे गोरगरीब रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणारे हॉस्पिटल येथील डॉक्टर संपावर असून त्यांच्या संपावर तोडगा निघावा याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवाक्षरही कोणी लोकप्रतिनिधी बोलत नाही किंवा प्रशासनातील जिल्हा शल्यचिकित्सक ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत नाही ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.
सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून काही नवीन निर्मितीची अपेक्षा तर सोडाच परंतु रेडिमेड उभारून दिलेल्या सुपर स्पेशालिटी सारख्या व्यवस्था सुद्धा निर्धोकपणे चालवू न शकणे हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. या शब्दात डॉ. सुनील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डॉ. सुनील देशमुख यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात गोरगरीब रूग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे कार्यान्वयन करण्यात आले होते. यामध्ये किडनीशी संबंधित शस्त्रक्रिया लहान मुलांच्या ( पेडियाट्रिक्स) शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरीच्या या तीन विषयांचा समावेश होता. येथे शस्त्रक्रिया करण्याकरिता तत्कालीन वेळेत विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने अमरावती शहरातील त्या त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा घेऊन हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. त्यावेळी प्रति शस्त्रक्रिया ज्या दराने करण्याचे ठरले होते तेव्हापासून आजतागायत यामध्ये वाढ झालेली नाही. यापूर्वीही शासन स्तरावरून डॉक्टरांच्या मानधनाची देणे थकीत झाल्याच्या घटना झालेल्या आहेत.
परंतु लोकप्रतिनिधी म्हणून वेळीच शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांचे देणे वेळेत अदा करण्यात आल्याने डॉक्टरांना संपावर जाण्याची नामुष्की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल वर ओढवल्याची घटना स्मरणात नाही. आज तब्बल सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा कुणा लोकप्रतिनिधींनी या डॉक्टरां सोबत चर्चा करण्याचे अथवा संपावर तोडगा काढण्याचे सौजन्य सुद्धा दाखविले नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे, अशी टीका डॉ देशमुख यांनी केली आहे. डॉक्टरांच्या मानधन वाढीच्या मागणीची पूर्तता करून त्यांची थकबाकी शासन स्तरावरून त्वरित अदा करून गोरगरीब नागरिकांच्या शस्त्रक्रिया तातडीने सुरू कराव्या अशी मागणी डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.