नागपूर: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या अभूतपूर्व प्रकारात एका वकिलाने वस्तू (चप्पल किंवा कागदाचा गुंडाळा) फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर न्यायालयीन कामकाज काही मिनिटे थांबले, मात्र सरन्यायाधीशांनी अत्यंत संयम राखत सुनावणी पुन्हा सुरू केली. हल्ला करणारा वकील राकेश किशोर (वय ७१) हा खजुराहोतील भग्नावस्थेतील भगवान विष्णू मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी दाखल याचिका फेटाळल्याबद्दल असंतुष्ट होता, अशी माहिती नंतर समोर आली.
या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वकील संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तर काही समाजमाध्यम वापरकर्त्यांनी “न्यायालयीन प्रतिष्ठेवरचा हल्ला” म्हणून याकडे पाहिले. दुसरीकडे, काही जणांनी धार्मिक भावना उफाळून या कृतीला समर्थन दर्शवले — “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणांनी सोशल मीडियावर वातावरण तापले. आता या प्रकरणात अनेक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्याचा समर्थन करण्यावर गुन्हा
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या न्यायालयीन कामकाजादरम्यान एका वकिलाने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर, पंजाब पोलिसांनी सरन्यायाधीशांविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह आणि जातीयदृष्ट्या भडकाऊ पोस्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शंभरहून अधिक समाजमाध्यम हँडल्सविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या हँडल्सनी सरन्यायाधीशांविरोधात जातीद्वेष पसरवणारे आणि द्वेषयुक्त मजकूर प्रसारित केला होता. पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले, “या पोस्टमधील मजकूर हिंसा भडकविणारा, संविधानिक पदाविषयी आदर कमी करणारा, अनुसूचित जातीतील व्यक्तीचा अपमान करणारा, जातीय वैर वाढविणारा आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणारा असा होता.”
दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या अभूतपूर्व प्रकारात, एका व्यक्तीने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला.त्या व्यक्तीला घोषणाबाजी करताना ऐकण्यात आले आणि तत्काळ सुरक्षारक्षकांनी त्याला न्यायालयातून बाहेर काढले. घटनेवेळी उपस्थित वकिलांच्या मते, त्या व्यक्तीने “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशी घोषणा केली. काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, त्याने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला, तर काहींच्या मते त्याने कागदाचा गुंडाळा फेकला. तो व्यक्ती वकिलाच्या पोशाखात होता. या गोंधळानंतरही सरन्यायाधीश गवई शांत राहिले आणि कामकाज सुरू ठेवले. पुढील वकिलाला बोलावताना त्यांनी म्हटले, “विचलित होऊ नका, आम्ही विचलित झालो नाही. बार कौन्सिल ऑफ इंडियाने संबंधित वकिलाचे निलंबन केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक यांनी पुढील कायदेशीर कारवाईस नकार दिल्याने दिल्ली पोलिसांनी त्या वकिलाला सोडून दिले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पांढऱ्या कागदाची चिठ्ठी जप्त केली, ज्यावर लिहिले होते — “मेरा संदेश हर सनातनी के लिए है… सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान.”