बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर आयुर्वेद पदवीधारकांना (बीएएमएस) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध शासकीय आरोग्य आस्थापनात नियुक्त करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील हजारो आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रगतिशील आणि देशात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतील कामकाज आणि लाखो सर्वसामान्य जनता, रुग्ण यांना आरोग्य सेवा मिळण्यात मोठी अडचण होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अंतर्गत ,महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी(गट ब ) ची भरमसाठ पदे रिक्त आहेत. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात असेच विदारक चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वच आरोग्य आस्थापनात अशीच स्थिती आहे.

हे ही वाचा…अकोला :‘लाडक्या बहीण’च्या लाभासाठी चक्क भाऊ रांगेत; वाचा नेमकं घडल काय?

यासंदर्भात घेण्यात आलेल्या आढाव्याची गंभीर दखल केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली. नामदार जाधव यांनी, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नियमित नियुक्त्या होईपर्यंत पर्यायी वैधकीय अधिकारी नेमण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने (खात्याने) नियमित नियुक्त्या होईपर्यंत आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना कंत्राटी वॆधकीय अधिकारी ( गट ब) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला .

शासन निर्णय जारी…

एवढेच नव्हे तर काल मंगळवारी, २४ सप्टेंबर २०२४ रोजी आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा मंत्रालयाचे अवर सचिव महेश लाड यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

त्यामुळे आता बी ए एम एस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेद व अलोपॅथी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र , फिरती आरोग्य पथके , दवाखाने यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ” ब ” या संवर्गातील पद कंत्राटी पद्धतीने आणि आयुर्वेद पदवीधर मधून भरण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २० डिसेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णय मधील अटी आणि शर्ती ला अनुसरून या नियुक्त्या करण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ” ब ” या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बी ए एम एस अहर्ताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

हे ही वाचा…अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या निर्णयाचे आणि शासनाच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रत्येक रुग्णालयाला आता वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे. तसेच आरोग्य सेवा विषयक प्रशासकीय कामकाजावरील ताण कमी होऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे . हा शासन निर्णय सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचं हित जोपासून तत्पर आरोग्य सुविधा उपलब्घ करून देणारा आहे अशी प्रतिक्रिया आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. यामुळे बीएएमस पदवीधर उमेदवार यांना आर्थिक स्थिरता आणि आरोग्य सेवेचा अनुभव सुद्धा मिळणार असल्याचे मंत्री जाधव यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurveda graduates appointed as contract medical officers until regular medical officers are available scm 61 sud 02