अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजनेवरूनसुद्धा बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, राज्य सरकार आता सांगत आहे की, आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र, निवडणुकीअगोदर तुम्ही लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र पैसे दिले. जशा निवडणुका झाल्या तशा अर्ध्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या. पैशाअभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना ही बंद करुन टाकली. कारण हा फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता. हा मदत म्हणून कार्यक्रम नसून त्यांचा राजकीय वापर करून घेण्यासाठी होता.
बच्चू कडू म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हेच माहिती नाही. कारण प्रशासन ठेवून सगळा माल जमा करायचा आहे. ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य सगळे नियंत्रण एकाच ठिकाणाहून करायचे आहे. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालावा. ईव्हीएमदेखील भाजपच्या कार्यालयात ठेवा, लोक येतील बटन तुम्ही दाबा, असा टोला कडू यांनी लगावला.
बच्चू कडू म्हणाले, आता आम्हाला सांगतात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील २०० उद्योगपतींचे तुम्ही १८ ते २४ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचे ३० ते ४० हजार कोटी कर्ज माफ करायला काय हरकत आहे. आमचे सोयाबीन, तूर, धान पिकाला २० टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच जीएसटीचा परतावा देणार असेही सांगितले होते, मात्र काहीच होत नाही. अतिवृष्टी झाली, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन ३ हजार ४०० रुपयांवर विकावे लागणार आहे, त्यावर सरकार बोलायला तयार नाही. १५ ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाही, तर आम्ही सोयाबीन जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीवर टीका
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरात मोहिमेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचेच आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न जाहिरातीतून होत आहे. यामागे सर्व महापुरुषांना जातींमध्ये वाटून टाकण्याचे षड्यंत्र असून, मराठा आंदोलन संपल्यावर शिवाजी महाराजांच्या पायावर फूल वाहताना देवाभाऊ दाखवणे हा याच षड्यंत्राचा भाग आहे. जाती-जातींमध्ये आणि महापुरुषांमध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.