यवतमाळ :पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात भटकंती करत घर, गाव, शहर सोडणारे असंख्य तरूण, तरूणी आपल्या आसपास असतात. आपल्या अंगभूत कौशल्यांचा शोध घेवून आपल्या गावातच रोजगार शोधण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र भक्ती शशांक दुधे ही अभियांत्रिकी पदवीधर तरूणी सध्या सोशल मीडियावर इन्फ्ल्युएंसर म्हणून असंख्य तरूणींची रोल मॉडेल ठरली आहे. यवतमाळसारख्या लहान शहरात ग्लॅमरस मॉडेल म्हणून भक्ती मोठे नाव कमवत आहे. शनिवारी साजऱ्या होत असलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीने हा प्रवास उलगडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या जाहिरातीचा ट्रेंड बदलला असल्याने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे जाहिरात करण्याचे फॅड आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, यु-ट्युब आदी सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक तरूण, तरूणी सध्या इन्फ्ल्युएंसर म्हणून नावलौकीकास आले आहेत. यवतमाळात अशा प्रभावकांमध्ये भक्ती दुधे हिचे नाव अग्रक्रमावर आहे. विशेष म्हणजे ती यवतमाळातील पहिली महिला इन्फ्ल्युएंसर आहे. आजच्या घडीला ती शहरातील प्रत्येक छोट्या, मोठ्या प्रतिष्ठानांची सोशल मीडियातून जाहिरात करते आहे. अभियांत्रिकी पदवीनंतर अंगभूत कौशल्यांचा वापर करून मॉडेलिंग, जाहिरातीचे क्षेत्र निवडून ती आत्मनिर्भर झाली आहे. भक्तीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील नंदूरकर विद्यालयात झाले.

शासकीय तंत्रनिकेतनमधून टेक्सटाईल विषयात डिप्लोमा केला. यवतमाळातच टेक्सटाईलमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व आता एमबीएचे शिक्षण घेत आहे. याच दरम्यान हातात आलेल्या मोबाईलने तिला फोटो काढण्याचे जणू व्यसनच लागले. त्यामुळे आई-वडिलांसह नातेवाईकही तिला नेहमी फोटोच काढते, तुझे कसे होईल म्हणून ओरडत असायचे. त्यावेळी नंदूरकर शाळेतील शिक्षक जयंत चावरे यांनी फोटोंचा हा छंद व्यवसायात बदलण्याची दिशा दिली. त्यातून स्वत:तील मॉडेल शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजमध्ये फॅशन शो झाला, त्यात भाग घेतला आणि तेथून मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॉडेलिंग म्हटले की, मुंबईशिवाय पर्याय नाही. मात्र आपण यवतमाळात आई-बाबांसोबत राहुनच या क्षेत्रात ‘सेलिब्रिटी’ बनण्याचे ठरविले, असे भक्ती म्हणाली. विविध सण, उत्सवानिमित्त केलेले फोटोशुट अनेक वर्तमानपत्रांत छापून आले. याच दरम्यान काही प्रतिष्ठानांकरीता व्हिडीओ शुट केले. त्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला.

यातून मग यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून जाहिरातीकरीता बोलावणे येवू लागले. सध्या दिवसातून एक, दोन जाहिरातींचे शुटिंग करते. त्यासाठी स्वत:च कंटेंट लिहिते. कोणाकडे नोकरी न करता स्वत:च्या कौशल्यावर पैसा कमवता येत असल्याचा वेगळाच आनंद असल्याचे भक्तीने सांगितले. सोशल मीडियावर भक्तीचे २० हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.  २०२४ मध्ये भक्तीला ‘मिस यवतमाळ’ हा पुरस्कार मिळाला. नागपूर येथे झालेल्या एका स्पर्धेतही तिने पुरस्कार मिळविला.

‘मिस महाराष्ट्र’साठीही तिची निवड झाली होती. मात्र परीक्षेमुळे ती सहभागी झाली नाही. पदवी घेतल्यानंतर तिने सहा महिने एका टेक्सटाईल कंपनीत नोकरीही केली. मात्र टेक्सटाईल या विषयात पदवीधर असल्याने याच क्षेत्रात उद्योग सुरू करण्याचे स्वप्न घेवून नोकरीतून बाहेर पडली. त्यांनतर मॉडेलिंग, जाहिरात आणि सोशल इन्फ्ल्युएंसर म्हणून कामावर लक्ष केंद्रित केल्याचे तिने सांगितले. भक्तीचे वडील शेतकरी असून, दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे शेती करतात, तर आई गृहिणी आहे. मोठ्या बहिणीचा विवाह झाला आहे.

आपल्याला आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबतच राहायचे आहे. त्यामुळे यवतमाळात व्यवसाय विस्तार करण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले. महिला दिनानिमित्त भक्तीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. महिलांनी, तरूणींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे. आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने प्रगतीच्या संधी अधिक असतात, असे भक्तीने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhakti shashank dudhe is a role model for young women as an influencer on social media nrp 78 amy