नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका एका दिवसापूर्वी ४० लाख रुपयांत उपलब्ध करून दिली जाईल, या आशयाचे भ्रमनध्वनी काही उमेदवारांना आल्याची धक्कादायक ध्वनिफित समोर आली . यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची आयोगाने दखल घेतली असून पुणे पोलिसांकडे तक्रार करत उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

राज्यातील लाखो विद्यार्थी ‘एमपीएससी’वर विश्वास ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु, परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या घटनेने उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले . ही कथित ध्वनिफित समाजमाध्यमांवरही फिरत आहे. यात एक महिला उमेदवाराला संपर्क करण्यात आल्याचे दिसून येते. “नमस्कार, मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल”, असे ध्वनिफितीत नमुद आहे.

पहिल्यांदा संपर्क केल्यावर संबंधित विद्यार्थिनीला हे खोटे वाटले. परंतु, पुन्हा संपर्क करण्यात आल. यावेळी “आपण गट-ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील” अशी मागणी करण्यात आली आहे. आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: डॉ. खरात

काही भ्रमणध्वनी क्रमांकावरुन उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त, पुणे यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे दूरध्वनी आल्यास contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर या संदर्भातील तक्रार दाखल करावी. उमेदवारांनी अशा प्रकरणांमुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news commissions reply on giving mpsc question paper for 40 lakhs question papers in strict custody dag 87 ssb