यवतमाळ : “बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान, नैराश्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, भाजपाची उपाययोजनांची मागणी

तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी , अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे.

यवतमाळ : तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मदत द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कळबं परिसरात ऋषी कदंब यांनी कापसाचा शोध लावला, अशी आख्यायिका आहे. जिल्ह्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यास पांढऱ्या सोन्याची खाण असे संबोधतात. मात्र सातत्याने येणारी अस्मानी संकटे, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते आकडे जिल्ह्याची ओळख मिटवायला लागले आहेत. गुलाबी बोंडअळी कापसाचे पीक पोखरत आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक निधीतून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करावी आणि जिल्ह्याची ओळख जपावी, अशी मागणी नितीन भुतडा यांनी केली.

जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील चार, पाच वर्षात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. शासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत दरवर्षी ४०० कोटींचे नियोजन होते, मात्र त्यात शेतकऱ्यांसाठी खडकू देखील दिला जात नाही. जिल्ह्याचे वार्षिक नियोजन करताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत करणे गरजेचे असल्याने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन भुतडा यांनी केले.

पीक विमा योजनेतून एक रुपयासुद्धा मदत आजपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यांच्याकडील निधीच्या खर्चाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना प्राधान्य देत गुलाबी बोंड अळीच्या उपाययोजनेकरिता आर्थिक मदत द्यावी, याचबरोबर यंत्र साहाय्य व तत्सम विशेष उपाय योजना म्हणून जिल्हा नियोजनमधून भरीव तरतूद करावी, अशी मागणी भुतडा यांनी केली.

कापूस हे पीक पीकविमा योजनामध्ये बसते परंतु अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन देखील तसा अहवाल शासनास दिल्या जात नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा मिळण्यापासून वंचित राहतो. यामुळे पीकविमा योजनेवरचा शेतकऱ्यांचा विश्वासही कमी होत असल्याचे भुतडा यांनी म्हटले.

हेही वाचा : ‘मी भीक मागून २ लाख देते, माझा नवरा परत आणाल का?’

बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून नैराशेच्या गर्तेत आहे. वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात दरवर्षी अनेक लोक जखमी होतात व अनेक जण मृत्यमुखी देखील पडतात. शिवाय वन्यप्राण्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबतही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे भुतडा यांनी म्हटले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp demand solutions for cotton farmer issue in yavatmal same as telangana pbs

Next Story
नागपूर : …म्हणून एसटी चालकाने त्याच्या १४ वर्षीय मुलीचा मृतदेह रिक्षाने दिग्रस ST आगारात नेला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी