‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या भाजपच्‍या प्रचार रथाची तोडफोड करण्‍यात आली आहे. यासंदर्भात शहर कोतवाली पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदविण्‍यात आली असून प्रचार रथावर झालेल्‍या हल्ल्याचा शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांशी संबंध आहे का, याचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रचारासाठी फिरत असलेल्या वाहनावर शहरातील कॉटन मार्केट परिसरामागे असणाऱ्या हॉटेल आदर्श समोर काही समाजकंटकांनी हल्ला केला. यावेळी या प्रचार रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचे छायाचित्रांसह असलेल्‍या अभियानाच्‍या फलकाची तोडफोड करण्‍यात आली, असा आरोप भाजपच्‍या नेत्‍यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकाारी आणि कार्यकर्ते शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. त्यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही दिली.

अमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आज घडलेल्या घटनेचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रचार रथावर झालेला हल्ला हा देशाचा अपमान असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp india flag campaign chariot vandalized in amravati demand action against miscreants amy