बुलढाणा: सुसंस्कृत, शांतताप्रिय समजले जाणारे बुलढाणा शहर एका युवकाच्या निर्घृण हत्येने पुन्हा हादरले आहे.मागील महिन्यात एका टोळक्याने केलेल्या क्रूर हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उडालेली खळबळ शांत होते नाही तोच पुन्हा एका युवकाची हत्या करण्यात आल्याने जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात वाढती गुन्हेगारी प्रामुख्याने युवकांमधील वाढती हिंसा, चाकूचा होणारा सर्रास वापर चिंतेचा विषय ठरला आहे…

बस स्टँडच्या मागील भागात जांभरून रोडवर एकाचा चाकू भोसकून खून झाला. मृत युवकाचे नाव शुभम रमेश राऊत (वय २७ वर्षे) असून आरोपीचे नाव ऋषी जवरे आहे. हा खून काल रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजे दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यांभरूण मार्गावरील राऊत व्यापार संकुल जवळ नाईटी चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात ही घटना घडली .

वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी या दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. ऋषी जवरे हा अपराधी प्रवृत्तीचा असल्याचे समजते. शुभम हा एका खाजगी रुग्णालय मध्ये कामाला होता. घटना प्रसंगी शुभम आणि त्याचा मित्र बॉबी दोघे गावंडे हॉटेलमध्ये जेवत होते. दरम्यान हातात चाकू घेऊन ऋषी त्या ठिकाणी पोहोचला. त्याचे कुणाशी तरी भांडण झालेले होते. ऋषी यावेळी नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणतात. तो कुणाला तरी चाकू मारेल, या भीतीने शुभम त्याच्याजवळ गेला.

परंतु भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीच्या चाकू मारला. शुभमने आणि बॉबी या दोघांनी मिळून प्रतिकार केला परंतु वार मर्मी लागल्याने शुभम खाली कोसळला. यात बॉबीला सुद्धा पायाला लागलेले आहे. प्रतीकारादरम्यान ऋषीला पण चाकू लागला. शुभमला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो वाचू शकला नाही.

रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती. शुभमची आई, वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. पोलीसही पोहोचले होते. मागील महिन्यात १ ऑगस्ट रोजी चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची घटना घडली. दीड महिन्यात बुलढाण्यात हा दुसरा खून झाला आहे. अर्थातच सुसंस्कृत बुलढाणा शहर आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाटेवर जात आहे का? अशी भीती सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.