बुलढाणा: स्थानिक महसूल यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असताना अथवा सोयीस्कर दुर्लक्ष करीत असताना मुंबई येथील दक्षता पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर परिसरात महाकारवाई केली. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील कारवाईपूर्वी मलकापूर येथे तळ ठोकून असलेल्या या पथकाने तब्बल ७१ लाख रुपये किंमतीचे अवैध बायोडिझेल, इंधन वाहक टँकर यासह अवैध विक्री केंद्राचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईबाबत काटेकोर गुप्तता बाळगण्यात आल्याने मलकापूर येथील महसूल यंत्रणांनादेखील याची कानोकानी खबर लागू देण्यात आली नाही. या कारवाईमुळे मलकापूर महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून जिल्हाधिकारी किरण पाटील याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे महसूल यंत्रणेसह जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलकापूर नजीकच्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग (५३) वर दोन ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध पंपावर ही अठ्ठावीस जानेवारीच्या उत्तररात्रीपर्यंत कारवाई करण्यात आली. यानंतर चौदा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. महामार्गावरील तालसवाडा बस थांबा आणि हॉटेल एकताजवळ अशा दोन ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता.

मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका घटनेत ३४.६१ लाख तर दुसऱ्या घटनेत ३६.२८ लक्ष रुपयांचे अवैध बायोडिझेल, वाहने, पंपावरील साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन टँकरमधून जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या टाकीत शेकडो लिटर इंधन खाली करताना रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी कलम ३,७,८ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, ‘मोटार स्पिरीट अ‍ॅण्ड हाय रिपेड डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ (रेगुलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशन अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रक्टिसेस) २००५ मधील कलम २ (ए), २ (ई), २ (एफ), २ (जी), २ (टी) ३ (५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नायब तहसीलदार श्रीकृष्ण साहेबराव उगले मलकापूर तर दुसऱ्या प्रकरणात पुरवठा निरीक्षण अधिकारी धनवर्षा हरणे यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मालक नसिम शाहील, रइस जमदार लखन बद्रीनाथ पांचाळ, इम्रान खान कामगार, राम सागर, खाजा सोहिल, असलम खान, समीर खान आदीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात मालक, टँकर चालक, पंप कर्मचारी यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावरील बायोडिझेल विक्रीकेंद्र (पंप) मधील जमिनीत गाडलेल्या टाकीत खाली करताना यांना रंगेहात पकडण्यात आले.

काटेकोर गुप्तता

मुंबई येथील दक्षता पथकाने मलकापूर परिसरात मुक्काम ठोकून अवैध विक्री केंद्र, आरोपीची कार्य पद्धती, हालचाली यावर पाळत ठेवली. यानंतर टँकर आले असताना दोन्ही ठिकाणी छापा टाकीत धडक कारवाई केली. स्थानिक महसूल अधिकारी, कर्मचारी यांनाही याची पूर्व कल्पना नव्हती. महाकारवाई सुरु असताना ते घटनास्थळी दाखल झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana illegal biodiesel worth 71 lakh seized along with tanker action of the mumbai squad on the highway scm 61 ssb