बुलढाणा : भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनण्यसाधारण महत्व आहे. गुरूला ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती पेक्षा जास्त महत्व देण्यात आले आहे. अशा गुरूचे गुरुपौर्णिमेला भक्त गण वंदन करतात, गुरु पौर्णिमेच्या पर्वावर संत गजानन महाराजांनाच आपला गुरु मानणाऱ्याविदर्भासह राज्यातील भाविकांची गुरूवारी विदर्भ पंढरी शेगाव मध्ये मांदियाळी झाली.

संत गजानन महाराजांचा दिवस गुरुवारीच यंदाची गुरु पौर्णिमा आल्याने हजारो भाविकामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. हजारो भाविकांचा मेळा, महाराजांच्या शिष्यानी फुलेलेले संत गजानन महाराज संस्थान मंदिर, समाधी स्थळाच्या दर्शनासाठी लागलेल्या दीर्घ रांगा, ‘गण गण गणात बोते” च्या गजराने दुमदूमणारा मंदिर परिसर, भाविकांनी फुललेले मंदिराकडे येणारे रस्ते असे गुरुवारी, संतनगरीचे चित्र होते.

नुकताच आषाढी एकादशी सोहळा पार पडला. या दिवशी लाखावार भाविकांनी शेगाव नगरीत हजेरी लावली आणि ते समाधी स्थळी नतमस्तक झाले. मात्र तरीही जेमतेम पाच दिवसांच्या अंतराने हजारो भाविकांनी गुरु पौर्णिमा निमित्त गुरु चरणी लीन होण्यासाठी संत नगरीत हजेरी लावल्याचे दिसून आले.आज गुरुवारी सकाळ पासूनच भाविकांचे आगमन सुरु झाले. दुपारी बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ आणि राज्यातील भाविक यांची गर्दी वाढली. यामुळे सकाळ च्या तुलनेत संस्थान मंदिर परिसरात दर्शनसाठी दीर्घ रांगा लागल्याचे चित्र होते. सकाळी अर्धा एक तासात होणाऱया दर्शनसाठी दीड दोन तास लागत होते.

गजानन महाराजांनी शेगाव नगरीत दीर्घ काळ वास्तव्य केले. महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या व्यथा, संकटे दूर केली. यामुळे पिढ्यानं पिढ्या त्यांना भाविकांनी दैवत आणि गुरु मानले. ही गुरु शिष्यची परंपरा आजच्या संगणक युगातही कायम आहे. अनेक लोक त्यांना गुरु मानू लागले.  म्हणूनच आज संत नगरीत शेगावात भाविक शिष्यांची दर्शनासाठी तोबा गर्दी उसळल्याचे दिसून आले. गुरु पौर्णिमा च्या पावन पर्व वर शेगाव नगरीत पारंपरिक उत्साह आणि भक्तीचे पवित्र वातावरण तयार झाले.