बुलढाणा : भरधाव कारचे टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनावर आदळली. या विचित्र अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना खामगाव ते मलकापूर मार्गावरील वडनेर भोलजी तालुका नांदुराजवळ आज मंगळवारी, २८ जानेवारी रोजी घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. नांदुरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस व अन्य सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, खामगाव येथील गोपाळ नगर रुख्मिणी लेआऊटमधील रोशन अनिल ठाकरे (२१), अमन पुरवार (२३) राहणार गोपाळ नगर, अभय वसंत कळसकर राहणार सुटाळा तालुका खामगाव व इतर काही तरुण एमएच १४ एफसी ०२८४ क्रमांकाच्या कारने उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून २७ जानेवारीच्या रात्री खामगावकडे येत आताना भरधाव कारचे टायर फुटल्याने ही कार समोरच्या वाहनावर आदळली. त्यामुळे रोशन ठाकरे हा जागीच ठार झाला तर अमन आणि अक्षय गंभीररित्या जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत रोशन हा आई-वडिलाचा एकुलता एक मुलगा होता. २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana speeding car hits a vehicle one person died on the spot two seriously injured scm 61 ssb