बुलढाणा : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित सुपर हिट ‘बॉर्डर’ हा चित्रपट अजूनही भारतीयांच्या स्मरणात आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात भारतीय सैनिकांचे शोर्य, बलिदान, देशप्रेम याचे प्रत्ययकारी दर्शन घडविण्यात आले होते.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका ताकदीने साकारणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टी याच्या विवाहच्या पहिल्या रात्रीच बॉर्डरवर युद्धासाठी जावे लागते, हे दृश्य निर्देशक जे. पी. दत्ता. यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केले होते.
तो चित्रपट आठवायचे कारण सैनिकांसाठी बॉर्डर हा नुसता चित्रपटच नव्हे तर त्यांच्या कर्तव्याचा एक भाग आहे. ते प्रत्यक्षातील नायक आहे. भारत पाक मधील युद्धजन्य परिस्थितीत जिल्ह्यातील किमान तीन सैनिकांना ही भूमिका नुकतेच वठवावी लागली आहे. लग्नाची हळद सुकण्याआधीच त्यांनाही सीमा रेषेवर मातृभूमीच्या रक्षणार्थ परतावे लागले आहे.
भारतीय सैनिकांसाठी देशसेवेच्या तुलनेत काहीच मोठे नसते हे बुलढाणा जिल्ह्यातील तीन कर्तव्यकठोर सैनिकांनी सिद्ध केले आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील अभिषेक मधुकर भोलाने या जवानाने याचा प्रत्यय आणून दिला आहे. लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोच, अभिषेकला देशाच्या कर्तव्याचे बोलावणे आले. सध्या देशात भारत- पाकिस्तान मध्ये युद्धजन्य स्थिती आहे. अभिषेक भोलाने आपला नवा संसार सुरू करण्याआधीच देशसेवेसाठी रुजू होत आहे.
चिखली तालुक्यातील किन्होळा येथे अभिषेक भोलाने यांचा विवाह मयूरी प्रल्हाद वडणकर यांच्याशी झाला. लग्न समारंभ सुरु असतानाच अभिषेक यांना फोनद्वारे तातडीचा संदेश आला. अरुणाचल प्रदेश येथील तवंग येथे कर्तव्यावर रुजू होण्याचे त्यांना आदेश मिळाले. अभिषेक भोलाने हे सशस्त्र सीमा दलातील जवान आहेत. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी ते सैन्यदलात भरती झाले होते. दरम्यान, वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आणि भारत पाकिस्तानमध्ये तनाव वाढला. अशा परिस्थितीत यत्किंचितही विचार न करता सेवेसाठी रुजू होण्याचा निर्णय अभिषेक यांनी घेतला.
दरम्यान, बुलढाण्याचे मुकेश नामदेव काकडे हे देखील देशसेवेसाठी निघाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि संपूर्ण देशाच्या सदिच्छा त्यांच्या सोबत आहे. अभिषेक भोलाने यांनी नुकतेच लग्न करून थेट सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची देशभक्ती प्रेरणादायी आहे. आ. गायकवाड यांनी या दोघांचा संपर्क कार्यालयात सत्कार केला. याप्रसंगी मृत्युंजय गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड आणि धर्मवीर युथ फाउंडेशन तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
लग्नाच्या चौथ्या दिवशीच जम्मू येथे परतला!
जम्मू येथे सैन्यात कार्यरत असलेला आणि सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील गणेश गजानन भंडारे त्यांच्या स्वतःच्या लग्नासाठी सुटीवर गावी आले होते. मात्र भारत व पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या संरक्षणार्थ तातडीने देशसेवेच्या कर्तव्यासाठी सीमेवर परतले आहे. विवाह ठरल्यामुळे तो जम्मूमधील अकनूर वरुन नुकतेच सुटीवर गावी आले होते. ६ मे रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील गजानन राऊत यांची मुलगी शिवानी सोबत त्याचा विवाह पार पडला. त्यानंतर नवरीला घरी आणत असताना सुखी संसाराची स्वप्ने दोघांनी पाहिली. लग्नाची हळद फिटत नाही तोच ९ मे रोजी तो देशसेवेच्या कर्तव्यासाठी सीमेवर परतले आहे. परतताना त्यांनी पत्नी आणि घरच्या मंडळीची कशीबशी समजूत घातली. तसेच मित्रांना देखील समजाविले.