बुलढाणा : खामगाव तालुक्या अंतर्गतच्या लाखनवाडा खुर्द शिवारातील जंगलात दोन बिबट्यांची अज्ञात कारणावरून निकराची झुंज झाली. यात पराभूत होऊन गंभीर रित्या जखमी झालेल्या बिबट्याला वन्य जीव विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून उपचारासाठी नागपूर कडे रवाना केले आहे.तालुक्यातील लाखनवाडा वन परिक्षेत्रातील जंगलात वन्य प्राण्यांचा नेहमीच मुक्त संचार असतो. यामध्ये बिबटची संख्याही लक्षणीय आहे. यामुळे लाखनवाडा वन परीक्षेत्रावर वन्य जीव विभागाला नेहमीच करडी नजर ठेवावी लागते.

परिसरातील शेतकरी सनी ग्रामस्थांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असत्ो.याच धर्तीवर लाखनवाडा खुर्द शेत शिवारातील घनदाट झाडीमधे एक बिबट्या जखमी अवस्थेत दडून बसला असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होत्ो. यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी याची माहिती खामगाव वन्य जीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांना दिली. यानंतर वनविभागाचे बचाव (रेस्क्यु) पथक गावकर्यांनी सांगितलेल्या परिसरात दाखल झाले.

अथक परिश्रम नंतर वन विभाग पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. बेशुद्ध झाल्यावर पथकातील अधिकाऱ्यांनी जखमी बिबटचे निरीक्षण केले. यावेळी बिबट्याच्या डोक्याला मोठी जखम झाली असल्याने रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. यामुळे जखमी बिबट्याला खामगाव येथील वन परिक्षेत्र कार्यालयात आणून पासुचिकित्सकांकडून प्रथमोपचार करण्यात आले. मात्र त्याच्या जखमा लक्षात घेता पुढील उपचारासाठी बिबट्याला नागपूर येथील प्राणी संग्रहालयात रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड, वनपाल पि. के. मिसाळकर, श्रीमती भागनागरे , श्रीमती शिंदे , लाखनवाडा बीटचे पोलीस हवालदार आनंद वाघमारे, पोलीस जमादार अमोल राऊत, अहेमद खान यांनी केली. या कारवाईत कर्मचाऱ्यांना परिसरातील शेतकरी, गावकरी प्रामुख्याने युवकांचे सहकार्य मिळाले. जखमी जनावर जास्तच धोकादायक असते. त्यामुळे वन कर्मचाऱ्यानी जायबंदी बिबट्याला लवकरच जेरबंद केल्याने लाखनवाडा वन परिक्षेत्रातील हजारो शेतकरी व गावकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या कारवाईने त्याना मोठा दिलासा मिळाल्याने गावकर्यांनी वन खात्याचे आभार मानले.