नागपूर: देशातील सर्वाधिक मुख कर्करुग्ण नागपूरसह मध्य भारतात आढळतात. इतरही भागात या रुग्णांची संख्या कमी नाही. या आजाराचे निदान लाळेच्या चाचणीद्वारे केवळ १५ मिनटांत शक्य झाले आहे. हे तंत्र नागपुरातील एका प्राध्यापकासह त्यांच्या विद्यार्थ्याने शोधून काढले असून त्याचे पेटंटही त्यांना मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 या आजाराबाबत एक मोठे संशोधन समोर आले आहे. नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. देवव्रत बेगडे आणि त्यांचा विद्यार्थी शुभेंद्रसिंग ठाकूर यांनी हा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनाला अमेरिकेचे आणि भारतीय पेटंट देखील मिळाले आहे. या संशोधनामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे कर्करोगाच्या विरोधातील एका अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वपूर्ण संशोधन आहे. मुळात कर्करोगाची लक्षणे आणि निदान उशिरा होत असल्याने वेळ, पैसे आणि कित्येक वेळा प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे, वेळीच निदान हा कॅन्सरपासून मुक्तीचा हमखास मार्ग आहे. मात्र, आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ १५ मिनिटात त्याला भविष्यात तोंडाचा कर्क रोग होणार आहे किंवा नाही, याचे खात्रीलायक निदान करणारे हे तंत्रज्ञान  विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीचे हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे.

९८.०४ टक्के संवेदनशीलता

नागपूरस्थित बायोटेक स्टार्टअप एर्लिसाइनने तोंडाच्या कर्करोगापूर्वीच्या स्थिती शोधण्यासाठी भारतातील पहिली लाळ- आधारित चाचणी विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान बायोमार्कर (एमएमपी २ आणि एमएमपी ९) वापरते, जे कर्करोगाच्या लवकर शोधण्यासाठी एक नॉन- इनवेसिव्ह उपाय देते. बायोमार्कर्सचा वापर करून बनवलेल्या या चाचणीत ९८.०४ टक्के संवेदनशीलता आणि १०० टक्के विशिष्टता असल्याचा दावा केला आहे.

सकारात्मक परिणाम

 प्रा. देवव्रत बेगडे म्हणाले, आमची चाचणी विशिष्ट लाळेच्या बायोमार्कर्स, एमएमपी २ आणि एमएमपी ९ ला लक्ष्य करते. ते तोंडाच्या कर्करोगाच्या प्रगतीचे अत्यंत सूचक आहे. या नॉन-इनवेसिव्ह आणि परवडणाऱ्या चाचणीचा उद्देश लवकर निदान व दरात लक्षणीय सुधारणा करणे,  तोंडाच्या कर्करोगाचा भार कमी करणे आणि  जीव वाचवणे हा आहे. 

शासकीय दंत महाविद्यालयाचे सहकार्य.

नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने १५० नमूने घेण्यात आले. त्यात सुरुवातीच्या अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसले. ही चाचणी रुग्णांना तीन जोखीम पातळयामध्ये विभागते: कमी (निरोगी), मध्यम (दृश्यमान जखमांशिवाय कर्करोगाची लवकर प्रगती), आणि उच्च (ट्यूमर किंवा जखमांची उपस्थिती ज्यासाठी पुढील निदान आवश्यक आहे), असेही प्रा. देवव्रत बेगडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer diagnosis possible through saliva test mnb 82 amy