नागपूर : रेल्वेगाडी सुटण्याची वेळ होईस्तोवर रेल्वे स्थानकावर पोहचायचे नाही आणि गाडी निघताच नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला रेल्वेडब्यातील साखळी खेचण्यास सांगून गाडी थांबण्याचे प्रकार वाढले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे गाडी सुटल्यास मुक्काम करावा लागतो आणि त्यासाठी खर्च पडतो. आणि साखळी खेचल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. एक हजार रुपये दंड बरा, पण मुक्काम नको म्हणून असे प्रकार वाढल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याचे निरीक्षण आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या जून महिन्यातील १९ दिवसांत विविध ठिकाणी साखळी खेचून तब्बल १५० रेल्वेगाड्या (मेल, एक्स्प्रेस) थण्बवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या रेल्वेगाड्यांचे विलंबाने गंतव्य ठिकाणी पोहचल्या आणि प्रवाशांना हकनाक त्रास झाला. कोणी प्रवासी किंवा त्याचा नातेवाईक चुकून फलाटावरच राहून गेला असेल, किमती चीजवस्तू खाली पडली असेल, समोर धोक्याचे संकेत असेल, प्रवाशाची प्रकृती बिघडली किंवा कोणता गुन्हा घडला आणि लगेच संबंधितांना मदत उपलब्ध करून देता यावी, यासाठी रेल्वेडब्यात ‘चेन’ (साखळी) लावलेली असते. ती ओढली की लोको पायलटला संकेत मिळतात आणि ते लगेच इमर्जन्सी ब्रेकचा वापर करून गाडी थांबवितात.
रेल्वेतून प्रवास करणारे गुन्हेगार, तस्कर, चोर आणि विनातिकीट प्रवास करणारे निर्जन ठिकाणी उतरून पळून जाण्यासाठी रेल्वेच्या डब्यात असलेली साखळी ओढत असल्याची बाब समोर आली आहे. एकदा गाडी थांबली की, ती पुन्हा सुरू होण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागतात. संबंधित गाडीला विलंब झाल्यास त्याचा इतर गाड्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे मागील सर्व गाड्यांना विलंब होतो.
मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या समाजकंटकांनी १ जून ते १९ जून या कालावधीत १५० रेल्वेगाड्यांमध्ये साखळी खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमधील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. गेल्या वर्षी याच अवधीत २८ गाड्यांना असा फटका बसला होता. यंदाची आकडेवारी त्यापेक्षा ५३ टक्के अधिक आहे. विनाकारण, जाणिवपूर्वक रेल्वेडब्यातील साखळी खेचणाऱ्याला रेल्वे अधिनियमानुसार दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, त्याला समाजकंटक जुमानत नाहीत. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ‘चेन पुलिंग’ रोखण्यासाठी विशेष जनजागरण अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गंत स्थानकांवर उदघोषणा केली जाते. तसेच पत्रक, स्टिकर वितरित केले जाते आहेत.