मागील काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले होतं. त्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावरून विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना घेरलं होतं. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला देण्यात आलेल्या नव्या कार्यालयाची पाहणी केली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना गाठलं. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रबोधन ठाकरेंचं ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं आहे.

हेही वाचा : गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री गावगाडा हाकणार, पडळकरवाडी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी

पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक देत, त्यातील संदर्भ उद्धव ठाकरेंच्या निर्दशनास आणून दिले. ‘आमच्याबरोबर भीक मागायला कोण येणार?’ असा उल्लेख प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या पुस्तकात केल्याचं पाटील यांनी उद्धव ठाकरेंना समजून सांगितलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड होते.

उद्धव ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांवर टीका

मुंबईत महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’त बोलताना उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. फुले दाम्पत्य नसते, तर आपण कोठे असतो, हे एका मंत्र्याने भीक शब्द वापरून दाखवून दिलं आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शेणमार आणि धोंडमार सहन करावी लागली, पण ते डगमगले नाहीत. मी माझ्या लोकांना शिकवणार असा निर्धार त्यांनी केला. त्या शिकल्या नसत्या आणि आपण शाळेत गेलो नसतो. आणि आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दीक भीक मागत असलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “मुंबई-सुरत रस्त्याची गुणवत्ता पाहावी, म्हणजे…”, आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, “संपला विषय आता तुमचा”

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

औरंगाबादमधील पैठणमध्ये एका कार्यक्रमात शाळांच्या अनुदानाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या आहेत. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या. आता त्याकाळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.