नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागात एका अतिथीगृहाजवळ वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. तो “एआय” निर्मित असल्याचे स्पष्टीकरण वनखात्याकडून येत नाही तोच पुन्हा या व्हिडीओचा पुढील भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे “एआय” निर्मित हे व्हिडिओ वनखात्यासमोर आव्हान ठरत चालले आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागात एका अतिथीगृहाजवळ वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले आहे. हा व्हिडिओ कृत्रीम बुद्धीमत्तेचा म्हणजे ‘एआय’ तंत्रांचा वापर करून तो तयार करण्यात आला आहे. चंद्रपूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर, ब्रह्मपुरी परिसरात किंवा राज्यातील कोणत्याही वन अतिथीगृहाजवळ अशी कोणतीही घटना घडलेली नाही याची पुष्टी झाली आहे. हा व्हिडिओ डिजिटली हाताळणी करून तयार करण्यात आला आहे, जो वेगवेगळ्या ऑनलाइन फुटेजचे मिश्रण करून आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी पार्श्वभूमी बदलून तयार केला आहे. नागरिकांनी असे बनावट व्हिडिओ शेअर करु नयेत. तसेच अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.
अशी खोटी माहिती प्रसारित केल्याने अनावश्यक दहशत निर्माण होते आणि वन्यजीवांच्या वर्तनाबद्दल चुकीची माहिती पसरते. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स अशा समाजमाध्यमावर सध्या एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वनविभागाच्या अतिथीगृहाजवळ वनरक्षक असलेला आहे. तेवढ्यात त्याठिकाणी एक वाघ येतो आणि त्या वनरक्षकावर हल्ला करुन त्याला ओढत घेऊन जातो. हा व्हिडिओ सुरुवातीला खराच वाटतो आणि त्यामुळेच शहानिशा न करता समाजामाध्यमांवर व्हिडिओची कोणतीही सत्त्यता न तपासता तो झपाट्याने प्रसारित करण्यात आला. या प्रकारामुळे वनखातेही हैराण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आणि विशेषकरुन ब्रम्हपूरी वनक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे. वनविभाग हा संघर्ष कसा कमी होईल, याचा प्रयत्न करत असतानाच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करुन काही व्यक्ती नागरिकांना धडकी भरवतील, असे व्हिडिओ तयार करुन समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहे. यामुळे वनखात्याच्या संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांना बाधा निर्माण होत आहे. वनरक्षकाला वाघ ओढून नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनखात्याकडून स्पष्टीकरण आणि कारवाईचे संकेत देण्यात आले. मात्र, या नव्या व्हिडिओने वनखात्याची डोकेदुखी पुन्हा वाढवली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागात एका अतिथीगृहाजवळ वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. तो "एआय" निर्मित असल्याचे स्पष्टीकरण वनखात्याकडून येत नाही तोच पुन्हा या व्हिडीओचा पुढील भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला… pic.twitter.com/UPnfWEtIDV
— LoksattaLive (@LoksattaLive) November 8, 2025
कायदेशीर कारवाईचे निर्देश..
ब्रह्मपुरी विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांना या बनावट सामग्रीच्या निर्मात्या आणि प्रसारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संबंधित सायबर कायद्यांतर्गत औपचारिक तक्रार दाखल करण्याचे निर्देश वनखात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
