चंद्रपूर : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची कमीशनखोरी आणि माजी नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्तेच कंत्राटदार झाल्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातील सिमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. माजी महापौर व भाजप महानगर अध्यक्षांच्या प्रभागात दीड कोटी रुपये खर्चून बांधलेला सिमेंट रस्ता अवघ्या तीन महिन्यात सिमेंट, गिट्टी, वाळू बाहेर पडून खराब झाला. आमदारांच्या पाठिंब्यामुळे व अधिकाऱ्यांच्या मौन भूमिकेमुळे कंत्राटदारांची हिम्मत वाढल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रभागात सिमेंट रस्ते, नाली, खुल्या जागेचा विकास तसेच इतरही कामे सुरू आहेत. आपचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, शहराध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, विशाल विरमलवार, क्रिश कपूर, आदित्य नंदनवार, ॲड. तबस्सुम शेख यांनी एका तज्ज्ञ अभियंत्यासह प्रत्येक प्रभागातील सिमेंट रस्ते, नाली तसेच इतरही कामांच्या दर्जाची नोंद घेण्याची मोहिम सुरू केली.

या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात भाजपच्या माजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या वडगाव प्रभागात तसेच भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या तुकूम प्रभाग क्र. १ मध्ये तब्बल दीड कोटींच्या खर्चातून तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याची गिट्टी, वाळू आणि सिमेंट निघून गेले असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. आर्थिक गैरव्यवहारामुळेच. रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत, असा आरोप आपने केला आहे.

वडगाव प्रभागातील सिमेंट रस्त्यांची अभियंत्याच्या माध्यमातून यंत्राद्वारे प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली असता, रस्त्याची ‘स्ट्रेंथ’ तपासण्यात आली. महापालिका व कंत्राटदाराने ‘एम-२०’ दर्जाचे रस्ते बांधल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात फक्त ‘एम १३’ इतकीच ‘स्ट्रेंथ’ नोंदवली गेली. असाच प्रकार तुकुम प्रभागातही आढळून आला. ही सर्व कामे एका विशिष्ट कंत्राटदारामार्फत होत असून तो स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहेत.

आमदारांच्या राजकीय पाठबळामुळे कामाचा दर्जा तपासल्या जात नाही, अधिकारी मौन बाळगून आहेत आणि कंत्राटदाराला मोकळे रान मिळाले आहे, असा आरोप आपने केला. केवळ रस्तेच नाही, तर कारंजे, भूमिगत गटार योजना, अमृत पाणी पुरवठा योजना, ही कामेही अशाच पद्धतीने झाली आहेत, असे जिल्हाध्यक्ष राईकवार यांनी सांगितले.