चंद्रपूर : राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरी मतदारसंघात भाजप – महायुतीचा विजय हा ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून द्याल हा विश्वास कार्यकर्त्यांचा उत्साह व ऊर्जा बघून व्यक्त करू शकतो असे म्हणत “माजी आमदार अतुल देशकर आगे बढो, भाजप तुम्हारे साथ है” अशी घोषणा देत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकप्रकारे माजी आमदार अतुल देशकर यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

ब्रम्हपुरी येथे शनिवारी माजी आमदार अतुल देशकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार सावे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते.

हेही वाचा – “आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार,” खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितले…

यावेळी मुनगंटीवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी भाजप व महायुतीचा विजय पक्का असल्याचे सांगितले. तसेच माजी आमदार अतुल देशकर यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार रहा हा संदेश मुनगंटीवार यांनी दिला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार २००९ पासून या विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. या विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोबाईल टॉवर आहे आणि जनतेने मोबाईलमध्ये काँग्रेसचे सिमकार्ड टाकले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास कासव गतीने होत आहे. कासवाचा क व काँग्रेसचा क येथे एकत्र आल्याने विकासात हा मतदारसंघ माघारला आहे. कासव देखील आत्महत्या करेल इतका मंद विकास येथे होत आहे. मात्र आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोबाईल टॉवर व सिमकार्ड भाजपचे टाका. तुमचा झपट्याने विकास होईल असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा – VIDEO : पावसात भटकंती अन् भरपेट मेजवानी; सात जीव घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश

काँग्रेस पक्षाचे नेते मायावी रूप घेतात. त्यांचे विचार देखील मायावी आहेत. त्यामुळेच काँग्रेसच्या एका खासदाराने निवडून येताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जणू काही त्यानेच सुरू केली अशा थाटात स्वतःचे फोटो असलेले फॉर्म छापून घेतले व जनतेकडून भरून घेण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे नेते इतके खोटारडे आहेत. महायुती सरकारने मुलींना अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मोफत केले आहे. मात्र बहुसंख्य शिक्षण संस्था काँग्रेस नेत्यांच्या असल्याने मुलींकडून फी वसूल करत आहेत. सरकार पैसे देईल त्यानंतर काय करायचे ते बघू असे सांगून फी वसूल करणे सुरू केले आहे. हा प्रकार बघून काँग्रेसच्या संस्थाच गायब करून टाकायच्या हा मुद्दा मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसच्या क ला कासवाच्या क ची बाधा झालेली आहे. तेव्हा आगामी निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी माजी आमदार अतुल देशकर यांना रिटर्न गिफ्ट देऊन भाजपचा विजय करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. एक प्रकारे मुनगंटीवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार देशकर यांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब केला आहे.