अमरावती : अनेक जागतिक विक्रम नावावर असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी तिसावा विश्वविक्रम हा अमरावतीत करण्याचे ठरवले आहे. सुमारे ५ हजार किलोची भरडधान्याची (मिलेट) खिचडी ते बनवणार आहेत. विष्णू मनोहर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात अमरावतीच्या एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉन येथे हा विश्वविक्रम नोंदवणार आहेत.
विष्णू मनोहर यांची सुप्रसिद्ध ‘विष्णूजी की रसोई’ गुणवंत लॉन येथे अमरावतीकरांच्या सेवेत रूजू झाली आहे. महिला उद्योजिका ओजस्विनी असनारे, मधू संदीप त्रिपाठी तसेच विष्णू मनोहर यांचे बंधू प्रवीण मनोहर यांनी ही खास भोजनाची मेजवानी खाद्यप्रेमींसाठी आणली आहे. याठिकाणी बसण्यासाठी अत्यंत आकर्षक व्यवस्था करण्यात आली आहे.
विष्णू मनोहर म्हणाले, रसोईमध्ये पराठा फेस्टिव्हल केला. त्यासाठी ५ बाय ५ फुटाचा पराठा तयार केला होता, तो पहिला विक्रम. त्यानंतर २०१७ मध्ये ५४ तासांचा कुकिंगचा जागतिक विक्रम केला. अयोध्येच्या राम मंदिर स्थापनेच्या वेळी हलवा तयार केला. कुंभमेळ्याच्या वेळीही ११ हजार किलोंचा हलवा केला. आतापर्यंत २९ विश्व विक्रम केले आहेत. आता लवकरच अमरावतीत ३० वा विक्रम करणार आहे. भगर किंवा तत्सम भरडधान्याचा वापर करून ही खिचडी तयार केली जाणार आहे.
विष्णू मनोहर म्हणाले, अमरावतीत लवकरच आम्ही तांबा, पितळ या धातूपासून तयार केलेली भांडी ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी ठेवणार आहोत. गृहिणींनी आपल्या स्वयंपाक घरात या भांड्यांचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले आहे. गृहिणींनी ही भांडी मोडीत काढू नये. पुण्याला रसोई सुरू केली. तिथेही लोकांची पसंतीची पावती मिळाली. अमेरिकेतही रसोई सुरू करण्याचा अचानक योग आला आणि तिथेही मराठी पदार्थाना आणि चवीला लोकांनी दाद दिली, असे ते म्हणाले.
अमर्यादित बुफे थाळी पद्धत ही ‘विष्णूजी की रसोई’चे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पंजाबी पदार्थ हे अस्सल पंजाबी चवीनुसारच बनविले जातात. विष्णुजींनी स्वतः विकसित केलेल्या चवीनुसार रेसिपीज बनविल्या जातात. म्हणूनच हे पदार्थ शाकाहारी खवय्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. जेवणाचा आस्वाद आणि घरच्या जेवणासारखी चव याचा अनोखा मेळ म्हणजे ‘विष्णूजी की रसोई’, ही खास खाद्य मेजवानी सुरू झाली असून आस्वाद घेण्याकरिता एक वेळ आवश्य भेट द्यावी, अशी विनंती विष्णू मनोहर व स्थानिक संचालकांनी अमरावतीकरांना केली आहे.