नागपूर: अनेक जागतिक विक्रम नावावर असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी तिसावा विश्वविक्रम नुकताच अमरावतीत पूर्ण केला.  सुमारे ५ हजार किलोची भरडधान्याची (मिलेट) खिचडी त्यांनी बनवली होती. त्यानंतर आता विष्णू मनोहर यांनी अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कायम शाकाहारी पदार्थ तयार करणाऱ्या आणि अशा पदार्थांसाठी त्यांची ख्याती असणारे प्रसिद्ध शेप विष्णू मनोहर हे आता ५००१ अंड्यांची भुर्जी बनवणार आहोत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुट पालन शास्त्र विभागाने १० ऑक्टोबर २०२५ जागतिक अंडी दिवसाच्या निमित्ताने अंड्यांविषयीच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून विश्वविक्रमी ५००१ अंड्यांची भुर्जी बनविण्याचा कार्यक्रम दिनांक १२ऑक्टोबर (रविवार) रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मध्य भारतातील प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर जी हे स्वतः ही विश्वविक्रमी अंड्यांची भुर्जी बनवतील अशी माहिती माफसुने दिली आहे.

मनोहर यांनी, रसोईमध्ये पराठा फेस्टिव्हल केला. त्यासाठी ५ बाय ५ फुटाचा पराठा तयार केला होता, तो पहिला विक्रम. त्यानंतर २०१७ मध्ये ५४ तासांचा कुकिंगचा जागतिक विक्रम केला. अयोध्येच्या राम मंदिर स्थापनेच्या वेळी हलवा तयार केला. कुंभमेळ्याच्या वेळीही ११ हजार किलोंचा हलवा केला. आतापर्यंत २९ विश्व विक्रम केले आहेत. त्यानंतर अमरावतीत ३० वा विक्रम केला. भगर किंवा तत्सम भरडधान्याचा वापर करून ही खिचडी तयार केली. आता ते ३१ वा प्रयोग करणार आहेत. अमर्यादित बुफे थाळी पद्धत ही ‘विष्णूजी की रसोई’चे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पंजाबी पदार्थ हे अस्सल पंजाबी चवीनुसारच बनविले जातात. विष्णुजींनी स्वतः विकसित केलेल्या चवीनुसार रेसिपीज बनविल्या जातात. म्हणूनच हे पदार्थ शाकाहारी खवय्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. जेवणाचा आस्वाद आणि घरच्या जेवणासारखी चव याचा अनोखा मेळ म्हणजे ‘विष्णूजी की रसोई’, ही खास खाद्य मेजवानी सुरू झाली आहे.

डोसा विक्रमही केला होता

साऊथ इंडियन डिशमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोसा आणि सांबार. संपूर्ण देशभरात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हटके बेत म्हणजे डोसा. अनेक खाद्य पदार्थाचे विक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मागील वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी आणखी एक विक्रम केला. एक एक करत पहिल्या दोन तासांत १ हजारपेक्षा जास्त डोसे शिजवले. त्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी एकच गर्दी केली होती.