Amravati Citizens Stranded Nepal अमरावती : नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या दंगलीत अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील काही नागरिकांनी आपले भयावह अनुभव प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहेत.

गेल्या सात वर्षांपासून नेपाळमध्ये नोकरी करणारे अजय गौर यांनी या हिंसेचा थेट अनुभव घेतला. ते म्हणाले, मला वाराणसीला जायचे होते आणि रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, दंगलीत अडकल्याने माझी रेल्वेगाडी सुटली. मनारी ते हटोडा दुचाकीने प्रवास करताना रस्त्यांवर जळालेल्या गाड्या दिसल्या. स्वतःचा जीव वाचवत कसाबसा पोहोचलो आणि सध्या एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला आहे. जिथे आहे तिथेच राहा, अशा सूचना मिळाल्याने आम्ही भीतीच्या वातावरणात जगत आहोत.

विमानतळावर धुराचे लोट, उड्डाणे स्थगित

नेपाळमधील या परिस्थितीमुळे भारत सरकारने तेथील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीमुळे विमानतळ परिसरात धुराचे लोट उठले असून, अनेक उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. ८ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या हिंसक आंदोलनात आतापर्यंत किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारीदेखील काठमांडूसह नेपाळमधील अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती होती आणि आंदोलने सुरूच होती.

मित्रांच्या सुरक्षेची चिंता

नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोकरीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक तरुण नेपाळमध्ये आहेत आणि त्यांना या आंदोलनाची तीव्रता जाणवत आहे. अमरावती जिल्ह्यातील अक्षय कान्हेरकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सध्या नेपाळमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची चाहूल आधीच लागली होती. युवकांमधील रोष वाढत चालला होता, पण त्याचे असे हिंसेत रूपांतर होईल, याचा विचारही केला नव्हता. मी सहा वर्षे नेपाळमधील बुटवॉल येथे नोकरी केली. अलीकडेच परत आलो, पण माझे अनेक मित्र अजूनही तिथे आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले. हे वातावरण लवकरच शांत व्हावे आणि सर्वांना सुरक्षित राहाता यावे, अशी माझी इच्छा आहे.

नेपाळमध्ये समाज माध्यमांवर बंदी घातल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी निदर्शने करण्यास सुरू केली आणि त्यांनी देशाच्या राजधानीचा ताबा घेतला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण ठार झाले आहेत.सोमवारी रात्री समाज माध्यमांवरील बंदी उठवण्यात आली मात्र निदर्शने सुरूच राहिली. यादरम्यान काठमांडू येथील विमानतळ देखील बंद करण्यात आला.